पिंपरी: सात-आठ जणांचा सहभाग असलेल्या एका अज्ञात टोळक्याने दापोडीत सहा वाहनांची तोडफोड करण्याची घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री दापोडीतील सुंदरबाग परिसरात एका टोळक्याने रस्त्यावर लावलेल्या चारचाकी फोडण्याचे सत्र सुरू केले. एकापाठोपाठ सहा वाहनांच्या काचा त्यांनी फोडल्या. शक्य त्या मार्गांनी वाहनाचे बरेच नुकसान टोळक्याकडून करण्यात आले. या तोडफोडीमुळे नागरिक घराबाहेर आले. त्यांनी तोडफोड करणाऱ्या तरूणांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही ते वाहनांचे नुकसान करत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.