लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून बुधवारी सुरुवात करण्यात आली. शहरात २ हजार ६२९ अनधिकृत जाहिरात फलक असले तरी बुधवारी केवळ २१ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत जाहिरात फलकांऐवजी कापडी जाहिरात फलक, झेंडे, भित्तीपत्रे आणि किऑक्सवरच जास्त कारवाई करण्यात आली आहे. किवळे येथे जाहिरात फलक पडून पाचजणांना जीव गमवावा लागल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले.

शहरात विनापरवाना मोठे लोखंडी जाहिरातफलक (होर्डिंग) मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आल्याची कबुली महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचा निर्णयही तातडीने घेण्यात आला. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावर दहा स्वतंत्र पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. तसेच अधिकृत जाहिरातधारकांना फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण तातडीने करून घेण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

हेही वाचा… पुणे : अवकाळी पावसाचा गावरान लिंबांना फटका

या आदेशानंतर आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. मात्र अनधिकृत जाहिरात फलकांची संख्या पहाता बुधवारी कारवाई संथ गतीने झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा… पुण्यात मद्यविक्रीतून २२२४ कोटींचा महसूल

अनधिकृत २१ जाहिरात फलक, १७३ कापडी फलक, १३ झेंडे, २१ पोस्टर आणि १५ किऑक्स अशा एकूण २३९ अनधिकृत जाहिरात फलकांव कारवाई करण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. विना परवाना जाहिरात फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत जाहिरात फलक, भित्तीपत्रके, झेंडे, कापडी फलक, किऑक्सवर यापुढे तीव्र कारवाई करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slow action on unauthorized billboards in pune pune print news apk 13 dvr
First published on: 20-04-2023 at 11:46 IST