पुणे : धूम्रपानामुळे फुफ्फुसांवर होणारा घातक परिणाम सर्वांना माहिती आहेच; मात्र त्याचा दुष्परिणाम पाठीच्या मण्याक्यावरही होत असल्याचे वैद्यकीय संशोधनांतून समोर आले आहे. धूम्रपानातील निकोटीन आणि इतर विषारी घटकांमुळे मणक्याच्या चकत्यांमध्ये दोष निर्माण होतात. त्यामुळे मणक्याच्या रचनेत बदल होऊन पाठदुखी वाढते, असा इशारा मणका तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक मणका दिन आज (१६ ऑक्टोबर) साजरा आहे. यंदाची या दिनाची संकल्पना ‘Invest in Your Spine’ (आपल्या मणक्यात गुंतवणूक करा) आहे. या पार्श्वभूमीवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मणका तज्ज्ञ डॉ. अमोल रेगे यांनी सांगितले की, धूम्रपानामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. धूम्रपानातील विषारी घटक थेट रक्तात मिसळतात. हे विषारी घटक रक्तप्रवाहातून हाडे आणि मणक्याच्या चकत्यांपर्यंत पोहचतात. त्यातून तेथील पेशींची मोठी हानी होते. त्याचा थेट परिणाम मणक्याच्या आरोग्यावर होऊ लागतो. तसेच, मणक्याची मजबुती कमी होऊन त्यातून तीव्र पाठदुखी किंवा नसांवर ताण येतो.

सध्या अनेक रुग्ण वयाच्या ३० ते ५०च्या आत मणक्याच्या गंभीर विकारांवरील उपचारांसाठी येतात. पूर्वी असे विकार वयाच्या साठीनंतर दिसून येत असत, पण आता पन्नाशीच्या आतच पाठदुखीचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे दिसते. यामागे केवळ धूम्रपानच नव्हे तर आधुनिक जीवनशैलीतील अनेक चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. दीर्घकाळ बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, चुकीच्या पद्धतीने झोपणे आणि वाढती स्थूलता या सर्वांचा एकत्रित परिणाम मणक्याच्या आरोग्यावर होत आहे, असेही डॉ. रेगे यांनी स्पष्ट केले.

मणक्याचे आरोग्य जपायचे असेल, तर धूम्रपानाचा त्याग, नियमित व्यायाम आणि संतुलित वजन हे तीन घटक आवश्यक आहेत. आपला कणा मजबूत राहिला, तरच आयुष्याची उभारी टिकते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

‘युनिलॅटरल बायपोर्टल एंडोस्कोपिक’ तंत्रज्ञान

आधुनिक वैद्यकशास्त्रात मणक्यावरील आजारांच्या उपचारपद्धतींमध्ये वेगाने प्रगती होत आहे. ‘युनिलॅटरल बायपोर्टल एंडोस्कोपिक’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. या तंत्रज्ञानामुळे मणक्यावरील शस्त्रक्रिया अधिक सोप्या, सुरक्षित आणि वेदनारहित झाल्या आहेत. ‘युनिलॅटरल बायपोर्टल एंडोस्कोपिक’ ही तंत्रप्रणाली म्हणजे सूक्ष्म छेदातून केली जाणारी एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया आहे. या प्रक्रियेत दोन लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष साधनांच्या सहाय्याने मणक्यावरील अडथळा किंवा चकत्यांवरील दाब कमी केला जातो. या पद्धतीत मोठ्या छेदाची गरज नसल्याने रक्तस्राव कमी होतो, वेदना कमी जाणवतात आणि रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे त्याला रुग्णालयात कमी वेळ रहावे लागते आणि रुग्ण दैनंदिन कामेही लवकर करू शकतो. बहुतांश रुग्ण दुसऱ्याच दिवशी चालू शकतात आणि घरी जाऊ शकतात, असे मणका तज्ज्ञांनी नमूद केले.