पिंपरी : शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पात्रामध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नदी पात्र अरूंद होत आहे. राडारोडा टाकणाऱ्यांकडून महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने एक लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे. तर, मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते. शहरातून वाहणाऱ्या तिन्ही नदी पात्रात राडारोडा व मातीचा भराव टाकून सपाटीकरण केले जाते. सिमेंटचा राडारोडा, भरावाची माती आणून टाकली जाते. भराव टाकून बेकायदा बांधकाम किंवा पत्राशेड बांधून ते भाड्याने देणे किंवा विकले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याबाबतच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींनुसार पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली. सापळा रचून संबंधित सर्व वाहनचालकांवर आणि वाहनांवर कारवाई केली आहे.

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

शहरातील विविध भागांत दररोज ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो तसेच आरएमसी प्लांटच्या मिक्सर गाड्या अशा वाहनांतून नदीच्या कडेला राडारोडा टाकण्यात येत होता. यामध्ये वाहनचालक शिवा राठोड, उमेश बारणे, वेदांत देसाई, आर.डी. वाघोले, तेजस उक्के, प्रकाश चौधरी, कांतीलाल पवार यांची वाहने पकडली. त्यांच्याकडून एक लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा – विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

हेही वाचा – VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका

नदीपात्रात भराव टाकल्यामुळे नदीपात्र अरूंद होत आहे. तसेच नदीप्रदूषण देखील होत आहे. यापुढे नदीपात्रात भराव टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या कारवाईसाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नदीमध्ये भराव टाकणाऱ्या जागामालक, गाडीमालक, वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच वाहनेही जप्त करण्याचा इशारा महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिला आहे.