करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार असल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे देशपातळीवर बराच खल झाला, त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आता राम मंदिर ट्रस्टमधील विश्वस्त असलेले आचार्य किशोरजी व्यास यांनी देखील पवार यांच्यावर टीका केली आहे. काही लोकांना मोदी आवडतच नाहीत त्यामुळं मोदीचं नाव घेताच त्यांच्या पोटात कसंतरी व्हायला लागतं, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
व्यास म्हणाले, मोदींमध्ये राष्ट्रभक्ती असल्यानेच अनेकांनी न जाण्याची सूचना करुनही ते भूमिपूजनाला जाणार आहेत. काही लोकांना मोदी आवडत नाहीत, त्यांच नाव घेताच त्यांच्या पोटात कसतरी व्हायला लागतं. त्यामुळे मोदींनी काहीही केलं तर असे लोक त्यांचा विरोध करणार आहेत. करोनासाठी स्वतः पंतप्रधान इतकं काम करीत आहेत की असं काम दुसरं कोणीही केलं नसतं. करोनाच्या काळात लोकांमध्ये प्रसन्नता वाढावी यासाठी मोदींनी अयोध्येला जाणं गरजेचं आहे. आम्हाला वाटतं की, सर्वांनी आपापल्या घरात आपल्या मंदिरांमध्ये त्यावेळी उत्सव साजरा करावा. अशा प्रकारे प्रसन्नतेची लाट निर्माण झाली तर करोनाचं संकटही कमी व्हायला सुरुवात होईल.”
आणखी वाचा- राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायला हवं – गोविंदगिरी महाराज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केल्यानंतर ते प्रत्यक्ष भूमिपूजनासाठी येण्यास तयार झाले. त्यासाठी त्यांनी २९ जुलै आणि ५ ऑगस्ट या दोन तारखा मागितल्या होत्या. त्यामुळे ज्योतिष शास्त्राप्रमाणे मुहूर्त काढून त्यांना या तारख्या पाठवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असून या दिवशी भूमिपूजन आणि शिलान्यासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी आचार्य व्यास यांनी दिली.