लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: तुमच्यामुळे मला तडीपार केले असून, तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत पोटच्या मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड घातला. आईलाही हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.२७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी ऋषिकेश महादेव चव्हाण (वय २४) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याचे वडील महादेव जालिंदर चव्हाण ( वय ४५, रा. ज्ञानदिप कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा- पुणे: खराडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडीपार केल्याचा आदेश घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये चल म्हटल्याचा आरोपी ऋषिकेश याला राग आला. त्यामुळे चिडलेला आरोपी ऋषिकेश हा दारू पिऊन आला. ‘तुझ्यामुळे मला तडीपार केले आहे, तू इतके दिवस माझ्याकडे लक्ष दिले नाही, तूच मला तडीपार करायला लावले आहे, आता तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत ऋषिकेश याने वडील जालिंदर यांच्या डोक्यात दगड घातला. आईने ऋषिकेशला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने आईलाही हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.