पुणे : राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार बुंदेसलिगासोबत करार करणार आहे. या करारानुसार बुंदेसलिगाच्या सहकार्याने राज्यात १४ वर्षांखालील लीग सुरु करण्याचा मानस असल्याची माहिती क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली. तसेच जगज्जेती तिरंदाज आदिती स्वामीचा यथोचित गौरव करण्यात येणार असून, पुरस्कार वितरणात क्रीडा गुणवत्तेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोमवारी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत दिवसे बोलत होते. राज्यातील क्रीडा गुणवत्तेचा गौरव करताना देण्यात येणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराबाबत कायमच होणारे वाद लक्षात घेता पुढील वर्षी म्हणजे २०२३-२०२४ पासून पुरस्काराच्या नियमावलीत सूसुत्रता आणि एकवाक्यता आणण्याच्या प्रयत्न केला जाईल, असे दिवसे यांनी सांगितले. थकित तीन वर्षांच्या पुरस्कार वितरणात ऋषिकेश अरणकल्ले, महेश ठाकरे आणि अभिजीत गुरव या तीन खेळाडूंचा नव्याने समावेश करण्यात आला. त्याचवेळी यापूर्वी जाहीर झालेल्या अमिता वाणी यांचा पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे : श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘शरद पवार ठरवतील तेच..’

तीन वर्षांचे थकित पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही खेळाडूंनी अन्याय झाल्याचे सांगत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करताना खेळाडूंचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्यायालयात गेलेल्या खेळाडूंचे म्हणणे ऐकून घेत राज्य क्रीडा प्रशासनाने त्यामधील मल्लखांबपटू ऋषिकेश अरणकल्ले या एकाच खेळाडूची विनंती मान्य करून त्याला २०२०-२१ साठी पुरस्कार जाहीर केला. विराज लांडगे, विराज परदेशी, कल्याणी जोशी या खेळाडूंची विनंती अमान्य करण्यात आली. त्याचबरोबर राज्याकडे स्वतंत्र अर्ज करणाऱ्या महेश ठाकरे (आट्यापाट्या), अभिजित गुरव (पॉवरलिफ्टिंग) या खेळाडूंचीदेखिल विनंती सर्व चौकशीनंतर मान्य करण्यात आल्याचेही दिवसे यांनी सांगितले. खेळांच्या संघटनांमधील अतंर्गत वाद आणि खेळांचा दर्जा हा चर्चेचा विषय असून, अशा सर्व संघटनांचा सर्वंकष अभ्यास करून नव्या वर्षात पुरस्कार नियमावलीत बदल केले जातील. पुरस्कारासाठी खेळाडूंनी न्यायालयात जाणे हे दुर्दैवी असून, भविष्यात अशी वेळ पुन्हा येणार नाही यासाठी नियमावली परिपूर्ण केली जाईल, असा विश्वासही दिवसे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – शिवछत्रपतींचे राज्य हे रयतेचे; शरद पवार यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वुशू या खेळातील क्रीडा उपप्रकारावरून वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या पुरस्काराचा वाद क्रीडा पुरस्कार समितीसमोर ठेवण्यात आल्याचे दिवसे यांनी सांगितले. या समितीच्या अहवालानंतर या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे न्यायालयात गेलेल्या कल्याणी जोशी यांचीही विनंती क्रीडा मंत्रालयाने फेटाळली असून, याच निकषाला धरून यापूर्वी जाहीर झालेल्या मिताली वाणी यांचा पुरस्कारही स्थगित करण्यात आला आहे.