पुणे : देशात अनेक राजे, संस्थानिक होऊन गेले. मुघल, यादवांसह अनेक सत्ता होत्या. त्यांची राज्ये ही त्यांच्या कुटुंबाच्या नावाने इतिहासात नोंदली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे वेगळे होते. ते कधीही भोसल्यांचे राज्य म्हणून ओळखले गेले नाही. ते नेहमीच रयतेचे राज्य राहिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.
शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठानने तयार केलेल्या ‘शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथाचे मुख्य संपादक डॉ. सदानंद मोरे यांना शिवराज्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. खासदार श्रीनिवास पाटील, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्रतिभा पवार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल निवृत्ती पवार या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला संघटित करून राज्य उभे केले. आधी एकप्रकारे परकियांचेच राज्य होते. सबंध समाज मरगळलेल्या अवस्थेत आणि परकियांच्या गुलामगिरीत होता. पिताश्रींनी शिवनेरीवर त्यांना मातेसमवेत आणून ठेवले. त्यांना इतर कुणाचे मार्गदर्शन लाभले हे खरे नाही. केवळ मातेचेच त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यातून समाजाला जागृत करून राज्य उभे करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी भोसल्यांचे राज्य नव्हे, तर हिंदवी स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य उभे केले. त्याला सर्वांचीच मान्यता मिळावी, यासाठी त्यांनी राज्याभिषेक केला.
डॉ. मोरे म्हणाले की, शिवराज्याभिषेकाबद्दल अनेकांनी लिहून ठेवले आहे. वेगवेगळे लोक त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे त्यातून समोर येते. यामधून शिवचरित्रही उलगडत जाते. या ग्रंथातून तोच प्रयत्न करण्यात आला आहे.
अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. चेतन कोळी यांनी सूत्रसंचालन केले.
गोब्राह्मण प्रतिपालक नव्हे, तर रयतेचा राजा
इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असावी लागते. तो कुणी आणि का लिहिला या बाबी तपासाव्या लागतात. गोब्राह्मण प्रतिपालक असे शिवाजी महाराजांना म्हणणे चुकीचे आहे. महात्मा फुले यांनी म्हटल्याप्रमाणे ते रयतेचे राजे होते. शिवाजी महाराजांना चिकटलेल्या प्रतिमांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा, असे मत डॉ. राजा दीक्षित यांनी मांडले.