डीजे, ढोल-ताशे, बँड यांचा रहिवाशांना त्रास

दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली ढोल-ताशे, डीजे लावून होणाऱ्या धिंगाण्यात शहरातील शांतता क्षेत्रेही धोक्यात आली आहेत. पुण्यातील अनेक रुग्णालयांजवळही हंडय़ा आणि स्पीकरच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. त्याचा त्रास रुग्णांना होणार आहे.

गणेशोत्सवाचे दहा दिवस रहिवासी आणि विशेषत: रुग्णालयातील रुग्ण जीव मुठीत घेऊनच असतात. आता पुण्यात त्यात गोकुळाष्टमी उत्सवाचीही भर पडली आहे. पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर यावर्षी काकणभर जास्तच जोशात साजऱ्या होणाऱ्या गोकुळाष्टमीमुळे शहरातील शांतता क्षेत्रंही धोक्यात आली आहेत. पुणे शहरात दहीहंडी उभारणाऱ्या नोंदल्या गेलेल्या मंडळांची संख्या दोनशेच्या वर आहे. याशिवाय नोंद न झालेल्या आणि दर पावलावर उभ्या असणाऱ्या हंडय़ांची गणतीच नाही. उपनगरांमध्येही साधारण प्रत्येक किलोमीटर अंतरावर एखाद्या मंडळाची, रहिवासी सोसायटीची हंडी उभी आहे. हंडी कोण फोडतो यापेक्षाही सर्वाधिक उत्सुकतेचा विषय हा डीजे आणि स्पीकरच्या भिंती हा दिसत आहे. अनेक मंडळांनी गणेशोत्सवात घातलेल्या पथक आणि स्पीकरवरील मर्यादेची कसर हंडीच्या निमित्ताने भरून काढण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. काही चौकांमध्ये हंडय़ा नसल्या तरी स्पीकरच्या भिंती मात्र आहेत. ढोल-ताशा पथके, बँड आणि स्पीकर्स अशा तिन्ही गोष्टी ठेवणारीही काही मंडळे आहेत. या सगळ्यात ‘शांतता क्षेत्र’ ही संकल्पनाच उद्ध्वस्त होणार, अशी स्थिती आहे.

रुग्णांना त्रास

रुग्णालये, शाळा यांच्या भोवतालचा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेला असतो. या परिसरात दिवसा ५० डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल अशी आवाजाची मर्यादा निश्चित केलेली आहे. मात्र गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करण्यासाठी या कशाचाही धरबंध न ठेवता रुग्णालयांच्या जवळ हंडय़ा उभ्या करण्यात आल्या आहेत. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पूना हॉस्पिटल, दीनदयाळ रुग्णालय, सिंहगड रस्त्यावरील जगताप रुग्णालय, कर्वे रस्त्यावरील सह्य़ाद्री रुग्णालय, गॅलेक्सी रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, कोथरूड भागातील शाश्वत रुग्णालय, जोशी रुग्णालय, ग्लोबल हॉस्पिटल, रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटल या सगळ्या मोठय़ा रुग्णालयांच्या जवळ दोन-तीन हंडय़ा आहेत. या हंडय़ा प्रसिद्ध किंवा गर्दी खेचणाऱ्या नसल्या तरीही मंडळातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला खतपाणी घालण्यासाठी पथके, स्पीकर असा सगळा जामानिमा या मंडळांनी केला आहे. याशिवाय छोटी रुग्णालये, नर्सिग होम यांची तर गणतीच नाही. लहान मुलांची, नवजात बालकांची शुश्रुषा करणाऱ्या रुग्णालयांचे परिसरही या गोंगाटापासून वाचलेले नाहीत.

बक्षिसांचे आमिष

अनेक मंडळांनी हंडी फोडण्यासाठी येणाऱ्यांना बक्षिसांची आमिषे दाखवली आहेत. कार, मायक्रोवेव्ह, स्कूटर, मोबाईल, पैठणी, चांदीची नाणी अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. नगरसेवक, इच्छुक उमेदवार, पक्षांचे नेते यांचा वरदहस्त असलेली मंडळे यांत आघाडीवर आहेत.

‘शासकीय नियम धुडकावा’

यावर्षी बहुतेक राजकीय पक्षांची अधिक भपकेबाज उत्सव करण्याची चढाओढ लागली आहे. ‘शासकीय नियम धुडकावा, पण सण साजरे करा’ अशा आशयाचे फलक सत्तेतील पक्षानेच लावला आहे. वडगाव परिसरात हा फलक लावण्यात आला आहे.