पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यात १४७.७७ लाख हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. बियाणे बदल दरानुसार सुमारे १९.२८ लाख क्विंटल बियाणांची गरज आहे. खरिपात सर्वाधिक ५०.७० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निव्वळ पेरणी क्षेत्र १६६.५० लाख हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात सरासरी १५१ लाख हेक्टर, तर रब्बीत ५१ लाख हेक्टरवर पेरणी होते. यंदाच्या खरीप हंगामात १४७.७७ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी बियाणे बदल दरानुसार १९.२८ लाख क्विंटल बियाणांची गरज आहे. त्यापैकी महाबीजकडून ३.७६ लाख क्विंटल, राष्ट्रीय बीज निगमकडून ०.५९ लाख क्विंटल, खासगी बियाणे कंपन्यांकडून २०.६५ लाख क्विंटल, असे एकूण २५.०६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत.

खरिपात सोयाबीन प्रमुख पीक असून, यंदा ५०.७० लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी १३.३१ लाख क्विंटल बियाणांची गरज असून, १८.४६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. सोयाबीन खालोखाल कापूस ४० लाख हेक्टर, भात १५.९१ लाख हेक्टर, मका ९.८० लाख हेक्टर, तूर, मूग, उडीद आदी कडधान्यांची १९ लाख हेक्टरवर आणि अन्य पिकांची १२.३६ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. सध्या कापूस बियाणांची विक्री सुरू झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात वाढीव दराने कापूस विक्री सुरू असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा : सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

‘गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावी. बनावट (बोगस) आणि भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी विक्रेत्यांकडून खरेदी पावती घ्यावी. पावतीवरील पीक, वाण, लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, बियाणांची पिशवी मोहरबंद असावी, किंमत, खरेदीदाराचे नाव, पत्ता, विक्रेत्याच्या नावाचा पावतीवर उल्लेख असावा. रोख किंवा उधारीच्या पावतीवर वरील सर्व उल्लेख असणे गरजेचे आहे. बियाणे खरेदी-विक्रीत कोणताही गैरव्यवहार दिसून आल्यास, भेसळीची शंका असल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा,’ असे आवाहन निविष्ठा आणि गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी केले आहे.