पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष प्रवेश फेरीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना आज आपले पसंतीक्रम भरून अर्जप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. सोमवारी (५ सप्टेंबर) ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश जाहीर होतील, त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन फेऱ्यांमधून एकूण ४५,५६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या प्रक्रियेत सध्या अर्जातील भाग एक पूर्ण न केलेले ५,०३७ विद्यार्थी, पडताळणी बाकी असलेले १३७८ विद्यार्थी, तर अर्जाचा भाग दोन पूर्ण न भरलेले ५१,४०९ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी म्हणून विशेष फेरीत सहभागी होण्याची संधी म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आज (शुक्रवार, २ सप्टेंबर) अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख असून ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची निवड यादी सोमवारी, ५ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवार, ८ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयांमध्ये कागदपत्रे आणि शुल्कासह प्रवेश निश्चित करायचा आहे. याच पद्धतीने कोटांतर्गत विशेष फेरी आणि बायफोकलची प्रवेश प्रक्रियाही सुरू राहणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश फेरीचे सुधारित वेळापत्रक अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.