पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांपैकी ११६ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. त्यात पुणे शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश असून, आता सुरू होणाऱ्या दुहेरी (बायनरी) मूल्यांकन प्रक्रियेसाठी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना दिला आहे.
विद्यापीठाच्या संलग्नता कक्षाने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन बंधनकारक असल्याने महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागानेही महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन पूर्ण करण्याबाबत अनेकदा निर्देश दिले आहेत. तसेच नॅक मूल्यांकनातील समस्या सोडवण्यासाठी २०२३मध्ये परिसस्पर्श ही योजना आणण्यात आली. त्यात महाविद्यालयांनाच मार्गदर्शक म्हणून नियुक्त करून त्यांनी नॅक मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्याची तरतूद करण्यात आली. अलीकडेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) मूल्यांकन प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांपैकी पाच वर्षे पूर्ण झालेल्या, तसेच पाच वर्षांपैकी अधिक कालावधी होऊनही ११६ महाविद्यालयांनी एकदाही नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. नॅककडून दुहेरी मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने संबंधित महाविद्यालयांनी त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार ११६ महाविद्यालयांमध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील ५१ महाविद्यालये आहेत. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासह हवेली, इंदापूर, मुळशी, भोर, खेड, आंबेगाव, पुरदंर तालुक्यातील पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान शाखा महाविद्यालये, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, शारीरिक शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, वास्तुकला अशा विद्याशाखांच्या महाविद्यालयांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहेत. तर उर्वरित महाविद्यालये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील आहेत.
दरम्यान, महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महाविद्यालयांना विद्यापीठाकडून आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.