दहावीच्या जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून, त्यात केवळ २५.३७ टक्के म्हणजे ३५ हजार ३४६ विद्यार्थी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, एटीकेटीचा आधार घेऊन अकरावीत प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी ७१ हजार ६८० इतकी असल्याने या परीक्षेतील एकूण १ लाख ७ हजार २६ विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्यासाठी नव्याने पात्र ठरले आहेत.
सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गेल्या वेळच्या ऑक्टोबर परीक्षेतील २९.२५ टक्क्यांच्या तुलनेत आता सुमारे चार टक्क्यांनी घसरली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या वर्षी ऑक्टोबरऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्याला राज्यातील १ लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थी बसले होते. त्याचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. १२ विद्यार्थ्यांंना विशेष श्रेणी मिळाली आहे. परीक्षा देणाऱ्यांपैकी २५ टक्केच विद्यार्थी सर्व विषयांत उत्तीर्ण झाले असले, तरी एटीकेटीच्या सवलतीमुळे १ लाख ७ हजार २६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील ४९ हजार ५०९ विद्यार्थी मार्चच्या परीक्षेतच एटीकेटी मिळवून प्रवेशासाठी पात्र ठरले होते. त्यामुळे या परीक्षेमुळे वर्ष शैक्षणिक वर्ष वाचू शकेल असे विद्यार्थी ५७ हजार ५१७ आहेत.
मात्र, एटीकेटीची सवलत घेऊन अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मार्चमध्ये दहावी आणि अकरावी अशा दोन्ही वर्षांच्या परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्यातच अकरावीच्या वर्षांचे पहिले सत्र संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक आहेत.
या विद्यार्थ्यांना दोन्ही इयत्तांचा अभ्यास करण्यासाठी एकच सत्र मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रयोगाचा किती लाभ होणार याबाबतच प्रश्न उभा राहिला आहे.
‘‘लगेचच एका महिन्यात दहावीची फेरपरीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळच मिळाला नाही. एरवी ऑक्टोबर-सप्टेंबरमध्ये परीक्षा होत असल्याने अभ्यासाकरिता किमान चार-पाच महिने मिळतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरात तर विद्यार्थ्यांचे क्लासशिवाय पानच हलत नाही. एका महिन्यात विद्यार्थ्यांची तयारी करवून घेणे क्लासेसना शक्य नव्हते. त्यामुळे, निकाल कमी लागला असावा.’’
प्रशांत रेडीज, प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना
गुणपत्रकांचे वाटप – ३१ ऑगस्ट, दुपारी ३ वाजता
छायाप्रतींसाठी अर्ज करण्याची मुदत – २५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर