scorecardresearch

अचानक बसचे ब्रेक निकामी झाल्याचं ST चालकाच्या लक्षात आलं; त्याने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण…; स्वारगेटमधील घटना

वाहतूककोंडीमुळे कामावर जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामगार, महिला, विद्यार्थ्यांसह, प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांची वाहने परिसरात अडकून पडली होती.

bus accident
सकाळी अकरा साडेअकराच्या सुमारास घडली ही घटना

सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर ब्रेक निकामी झाल्यामुळे एसटी चालकाने चार दुचाकींसह काही मोटारींना धडक दिली. त्यामुळे अपघातात काहीजण जखमी झाले असून त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

हा अपघात गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शंकर महाराज उड्डाणपुलावर घडला. साताऱ्याहून प्रवाशांना घेऊन आलेली एसटी स्वारगेटच्या दिशेने मार्गक्रमण करीत होती. त्यावेळी, अचानकपणे चालकाला ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. त्याने एसटीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटीने सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपूल परिसरात चार दुचाकींस्वारांना धडक दिली.

सातारा आगाराची विना वाहक विना थांबा एसटी (एमएच ०६एस ८४६७ ) गुरूवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास शंकर महाराज मठ परिसरातून चालली होती. त्यावेळी बसमध्ये २० ते २५ प्रवाशी होते. चालकाला ब्रेक लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, शंकर महाराज मठ परिसरात उड्डाणपुलावर एसटी चालकाने चार दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाल्याने दोन्ही बाजूची वाहतुकीची कोंडी झाली. त्याशिवाय एसटी चालकाने इतर मोटारींनाही धडक दिल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चार दुचाकी आणि काही मोटारींनीा एसटी धडकल्यानंतर तिचा वेग कमी झाला. त्यानंतर एसटी थांबण्यास मदत झाली.

शहरातील महत्त्वाचा रहदारीचा रस्ता असलेल्या शंकर महाराज उड्डाण पुलावर अपघात झाल्यानंतर मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामगार, महिला, विद्यार्थ्यांसह, प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांची वाहने परिसरात अडकून पडली होती. अपघातानंतर काही वेळाने वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही बाजूंची वाहतूककोंडी सोडविण्यात आली. मात्र, परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना वाहतूककोंडीचा फटका सहन करावा लागला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St bus break failed near swargate pune print news scsg

ताज्या बातम्या