लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांची वेतवाढ, थकबाकी, महागाई भत्ता आदी मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर ५ मार्च रोजी राज्यातील सर्व बस स्थानके आणि आगारांच्या बाहेर निदर्शने करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना २०१८पासून महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सन २०१६-२० कालावधीत एकतर्फी लागू केलेल्या वेतनवाढीत घरभाडे भत्त्याचा दर वाढवून द्यावा. या वेतनवाढीतील घरभाडे भत्त्याची रक्कमदेखील थकित आहे, अशा अनेक मागण्यांबाबत कामगार संघटनांकडून वारंवार बैठका घेऊन आश्वासने देण्यात आली आहेत. अद्याप याबाबत कुठलाच निर्णय घेतला जात नसून, संघटनेकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पाच मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व आगारांच्या बाहेर मागण्यांसंदर्भात निदर्शने करण्यात येणार आहेत, असे पुणे संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी मागण्या कोणत्या

  • भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून उचल मिळावी
  • नवीन शिस्त आणि कार्यपद्धती लागू करावी
  • खात्यांतर्गत प्रथम बदली अर्जानुसार बदल्या कराव्यात

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विशेषत: कामगारांना ५० टक्के महागाई भत्ता लागू झाला असताना अद्याप अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने पाच मार्च रोजी आगारांच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. -संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटना