खरेदीखतासाठी शंभरऐवजी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर घेण्याची सक्ती करण्याचा प्रकार शहरात होत असून, या प्रकाराला ‘असोसिएशन ऑफ रिअर इस्टेट एजंट्स’ने (एरिया) तीव्र विरोध केला आहे. याबाबत कोणतेही निर्देश नसताना ग्राहकांची नाहक पिळवणूक सुरू असल्याची बाब असोसिएशनने नोंदणी व मुद्रांक उपमहानिरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
एरियाचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी याबाबत सांगितले की, घर विकत घेताना सुरुवातीला पूर्ण मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरून करारनामा केल्यानंतर त्यानंतर होणारे खरेदीखत शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जाते. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने केलेले शंभर रुपयांचे चलन नोंदणीसाठी ग्राह्य़ धरले जाते. मात्र, खरेदीखतासाठी शंभर रुपये मूल्याचा स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडे मागितला असता, खरेदीखतासाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प घ्यावा लागेल, असे बहुतांश विक्रेते सांगतात. ऑनलाईन पद्धतीने शंभर रुपयांचे चलन चालत असताना शंभर रुपयांचा स्टॅम्प का दिला जात नाही? त्याचप्रमाणे लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स करार करताना दोनशे व तीनशे रुपयांचे मुद्रांत शुल्क चलनाद्वारे स्वीकारले जातात. पण, स्टॅम्पच्या विक्रेत्याकडे शंभरचे दोन किंवा तीन स्टॅम्प मागितले असता, पाचशेचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागेल, असे सांगितले जाते.
शिंगवी यांच्यासह राजेंद्र, दोशी, सचिन कात्रे, उमाशंकर यादव, संदीप चव्हाण, संजय ढोकळे आदींच्या शिष्टमंडळाने या संदर्भात मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक चिंतामण भुरकुंडे यांची भेट घेऊन या प्रकरणी निवेदन देण्यात आले. शंभर रुपयांच्या स्टॅम्पबाबत काही निर्देश दिले आहेत का, याच्या खुलाशाची मागणी शिष्टमंडळाने केली. अशा प्रकारचे कोणतेही निर्देश दिले नसल्याचे उपमहानिरीक्षकांनी स्पष्ट केले व कारवाईचे आश्वासनही दिले.