पुणे : राज्यातील खासगी विद्यापीठांच्या ‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रीसर्च असोसिएशन) या संघटनेच्या माध्यमातून खासगी विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पेरा सीईटी २०२१ यंदा १६ ते १८ जुलै दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी १० जुलै ही अंतिम मुदत असून, २३ जुलैला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राज्य शासनाकडून सीईटी घेतली जाते. तसेच पेरा सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना राज्यातील १३ खासगी विद्यापीठांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरबसल्या पेरा सीईटी देता येईल. या प्रवेश परीक्षेमुळे खासगी विद्यापीठांतील प्रवेशांना गती मिळेल. परीक्षेबाबतची अधिक माहिती http://www.peraindia.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड आणि पेराचे उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.