नारायणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज पुढील वर्षीच्या शिवजयंतीपूर्वी लावला गेला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. या मागणीसाठी शासकीय कार्यक्रमावर टाकलेला बहिष्कार हा भगवा जाणीव आंदोलनाचा एक ट्रेलर होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून कोल्हे करत आहेत. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांची भेट घेतली. तसेच पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील खासदारांच्या बैठकीतही कोल्हे यांनी ही मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे उद्विग्न होत कोल्हे यांनी शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची घोषणा करून शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर गडाच्या पायथ्याशी तिष्ठत ठेवलेल्या शिव-शंभु भक्तांसमवेत पायी गड चढून जाणार अशी भूमिका घेतली.

हेही वाचा >>> Chinchwad Election: भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत!, आज ‘या’ स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. कोल्हे यांच्या भूमिकेला राज्यभरातील शिवभक्तांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यातच शासकीय कार्यक्रम होईपर्यंत गडाच्या पायथ्यापासून दूर अंतरावर रोखण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अनेक महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास झाला. त्यामुळे कोल्हे यांनी पहिल्या पायरीवर जवळपास तासभरापेक्षा जास्त वेळ ठाण मांडले होते. गडावरचा कार्यक्रम संपताच खासदार डॉ. कोल्हे यांच्यासमवेत शिवभक्तांनी गडावर जाताना त्यांच्या भगवा जाणीव आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शिवनेरी गडावर भगवा ध्वज लागलाच पाहिजे अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. डॉ. कोल्हे म्हणाले की, हे आंदोलन राजकीय अथवा पक्षीय नाही. तर, ही महाराष्ट्रातील शिव-शंभु भक्तांची भावना आहे, एक वर्षाच्या कालावधीत शिवनेरी गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू.