पुणे :‘सध्याच्या काळात ‘मी’पणा वाढला असून, ‘आम्ही’चे महत्त्व कमी होत आहे. याचा परिपाक समाजामध्ये आजारपण वाढण्यात होत असून, माणसाचे समाधान हरपत आहे’अशी खंत महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त)डॉ. माधुरी कानिटकर यांनी शनिवारी व्यक्त केली. विविध उपचार पद्धती म्हणजेच पॅथींची चर्चा होत असते. पण, रुग्णसेवेमध्ये सहानुभूती (सिंपथी) महत्त्वाची आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डाॅ. स्वाती भावेलिखित ‘अनुभवातून अनुभूती’ या पुस्तकाचे प्रकाशन माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी कानिटकर बोलत होत्या. सनदी लेखापाल सुरेश रानडे, पुस्तकाच्या सहलेखिका अंजली दुरुगकर, ग्रंथालीच्या डाॅ. लतिका भानुशाली आणि यशवंत भावे या वेळी उपस्थित होते.
कुलगुरू म्हणून नव्हे, तर स्वातीची मैत्रीण या नात्याने उपस्थित असल्याचे सांगून कानिटकर म्हणाल्या, ‘स्वाती ही भारतीय बालरोगतज्ज्ञ परिषदेची पहिली महिला अध्यक्ष झाली. व्यावसायिक यश संपादन करताना तिला महिला असण्याचा अडसर ठरला नाही. तिने महिला बालरोगतज्ज्ञ परिषदेची स्थापन केली.’
बालविधवा असलेली माझी आजी माझी प्रेरणा असल्याचे सांगून कानिटकर म्हणाल्या, ‘महर्षी कर्वे यांच्या संस्थेत दाखल करण्यात आलेली माझी आजी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन डॉक्टर झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यासमवेत विवाह करून आजोबा आणि आजी यांनी आफ्रिकेत जाऊन सामाजिक कार्य केले होते.’ ममता क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.
वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवर आधारित लेखन करण्याचा सल्ला मला डॉ. किरण बेदी यांनी दिला होता. पण, माझ्याकडे वेळ नसल्याने पती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. राजीव यांनी माझ्याविषयी आणि आमच्या सहजीवनाविषयी लेखन केले आहे.- डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ