पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातील विद्यार्थी नोंदणीचा १० लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात पुणे विभागातील १ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांचा समावेश असून, पहिल्या नियमित फेरीसाठी विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

शिक्षण विभागाने विद्यार्थी नोंदणीबाबतची माहिती दिली.संपूर्ण राज्यात यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रियाऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यात ९ हजारांहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २० लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया २६ मेपासून सुरू करण्यात आली. नोंदणीमध्ये विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यानंतरही रविवारपर्यंत राज्यभरातील १० लाख ३३२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे विभागातील १ लाख ६४ हजार ९८३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील ९४ हजार २४३ विद्यार्थी असून, त्या खालोखाल अहिल्यानगर जिल्ह्यातील ३९ हजार ७५९, तर सोलापूर जिल्ह्यातील ३० हजार ९८१ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. यंदा दहावीच्या परीक्षेत १४ लाख ५५ हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पदविका, आयटीआयला जाणारे विद्यार्थी वगळता अकरावी प्रवेशासाठी किती विद्यार्थी नोंदणी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.