पुणे : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली असून, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात बैलगाडा मालक, प्रेमी आणि शौकीन यांनी जल्लोष साजरा केला आहे. बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरू झाल्याने राजकीय नेत्यांमधील श्रेयवाद पाहायला मिळत आहे. शिरूर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांमध्ये श्रेयवादावरून स्टेटस वॉर बघायला मिळत आहे.

“आपल्या फकड्याने करून दाखवलं” असे खासदार अमोल कोल्हेंच्या समर्थकांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून आमदार महेश लांडगेंच्या समर्थकांना डिवचले आहे. तर, आमदार महेश लांडगेंच्या समर्थकांनी “पैलवानाने करून दाखवले” असे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवले असून चोख प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही समर्थकांमध्ये स्टेटस वॉर रंगल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – पुणे: चाकणमध्ये तीन हजार किलो गोमांस पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार महेश लांडगे यांनी वेळोवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून न्यायालयात पाठपुरावा केला. तसेच, खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील बैलगाडा शर्यतीबाबत संसदेत आवाज उठवण्याचे काम केल्याचे सर्वांनी पाहिले आहे. नुकतंच पुणे जिल्ह्याच्या विभाजनावरून खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला होता. नवीन जिल्हा निर्मितीपेक्षा पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे, असे सूचित केले होते. आता पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीच्या श्रेयवादावरून आमदार महेश लांडगे आणि खासदार अमोल कोल्हे समोरासमोर आले आहेत.