पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मात्र विद्यापीठाच्या आवारात हौशी सायकलस्वारांना प्रतिबंध करण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला असून, चारचाकी, दुचाकींना विद्यापीठात मुक्त प्रवेश दिला जात असताना केवळ हौशी सायकलस्वारांना प्रवेशबंदी करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठाचा परिसर जवळपास चारशे एकराचा आहे. मोठ्या प्रमाणात असलेली झाडी आणि स्वच्छ हवेमुळे नागरिकांकडून व्यायामासाठी आणि चालण्यासाठी विद्यापीठ परिसराला पसंती दिली जाते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यायामासाठी किंवा चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विद्यापीठ आवारात प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यानंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने निर्बंथ शिथिल करण्यात आल्यावर नागरिकांना व्यायाम आणि चालण्यासाठी प्रवेश देण्यात येऊ लागला. मात्र आता हौशी सायकलस्वारांना प्रतिबंध करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. टाळेबंदीनंतर एकीकडे सायकलचा वापर वाढत असताना विद्यापीठ परिसरात हौशी सायकलस्वारांना करण्यात आलेल्या प्रतिबंधाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.




पेडल पुशर्स या सायकलस्वारांच्या गटाचे डॉ. महेंद्र ओसवाल म्हणाले, की सायकलस्वाराने हेल्मेट किंवा सायकलिंग जर्सी घातलेली असल्यास त्यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरून परत पाठवले जाते. त्याबाबतची कारणे सुरक्षारक्षकाकडून सांगितली जात नाहीत. दुपारच्या वेळेत साध्या कपड्यात साधी सायकल घेऊन गेल्यास प्रवेश मिळतो. म्हणजे व्यायामासाठी किंवा हौस म्हणून सायकल चालवणाऱ्यांना प्रवेशबंदी असल्याचे दिसते. विद्यापीठात दुचाकी, चारचाकी यांना मुक्त प्रवेश आहे. मात्र व्यायामासाठी किंवा हौशी सायकलस्वारांना प्रवेश न देण्याचा विद्यापीठाचा निर्णय विचित्र आहे.
दररोज वीस-पंचवीस किलोमीटर रोज सायकल चालवतो. टाळेबंदीपूर्वी आठवड्यातून एकदा विद्यापीठात जात होतो. मात्र सध्या विद्यापीठाकडून सायकलस्वारांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. फिरायला येणाऱ्यांना, साध्या सायकलस्वारांना प्रवेश दिला जातो, पण सायकल चालवण्याचा वेश परिधान केल्यावर प्रवेशबंदी करण्यामागील विद्यापीठाचा विचार काय हे कळत नाही. प्रवेशबंदी करण्यापेक्षा सायकलस्वारांना वेळ ठरवून द्यावी, असे हौशी सायकलस्वार उद्धव गोडबोले यांनी सांगितले.
सकाळी आणि संध्याकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने विद्यापीठ आवारात व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी येतात. तर सायकलस्वार समूहाने येत असल्याने चालण्यासाठी येणाऱ्या अन्य नागरिकांची गैरसोय होते. या पूर्वी सायकलस्वारांमुळे अपघाताचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे विद्यापीठ आवारात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी वगळता हौशी सायकलस्वारांना प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु या संदर्भात विनंती प्राप्त झाल्यास सकारात्मक विचार करता येईल.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ