पुणे : पुण्यातील भटक्या श्वानांची संख्या अडीच लाखांहून अधिक असून या श्वानांना रेबीजमुक्त करण्यासाठी आणि त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आता पुणे महापालिकेने अनोखे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांना मायक्रोचिप बसविण्यात येणार आहेत. राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून, याची सुरुवात या महिन्यापासून होत आहे.

पुण्यातील भटक्या श्वानांची गणना महापालिकेने मे २०२३ मध्ये केली होती. त्या वेळी शहरात १ लाख ७९ हजार ९४० श्वान आढळले होते. त्याआधी २०१८ मध्ये ही संख्या ३ लाख १५ हजार होती. त्यात पाच वर्षांत मोठी घट झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर महापालिकेत ३४ गावे समाविष्ट झाल्याने या गावांतील भटक्या श्वानांची त्यात भर पडली. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची एकूण संख्या सुमारे अडीच लाखांवर पोहोचली आहे. भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांची नसबंदी करण्याची मोहीम सातत्याने राबविली जात आहे. याचबरोबर श्वानांना रेबीज प्रतिबंधक लसही दिली जात आहे. आता पशुवैद्यकीय विभागाने शहरातील श्वानांना मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

‘राज्यात प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात येत आहे. एका खासगी कंपनीकडून या चिप मोफत मिळाल्या आहेत. या चिप कुत्र्यांच्या खांद्याच्या भागात इंजेक्शनद्वारे टोचल्या जाणार आहेत. या चिपमध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या मायक्रोचिपला १५ अंकी क्रमांक असेल आणि तो कुत्र्याला मिळेल. यामुळे कर्मचारी त्यांच्याकडील स्कॅनरच्या साहाय्याने कुत्र्याचा खांदा स्कॅन करून या क्रमांकाच्या आधारे त्याची सर्व माहिती मिळवतील. सुरुवातीच्या टप्प्यात सहाशे कुत्र्यांना मायक्रोचिप लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, याची सुरुवात या महिन्यापासून होत आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये य़ा प्रयोगाचा चांगला परिणाम दिसून आला आहे,’ असे महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले.

मायक्रोचिपचे फायदे

– खांद्यावर त्वचेच्या खालच्या स्तरावर बसविल्याने निघून जाण्याचा धोका कमी.

– मायक्रोचिप बसविताना श्वानांना अतिशय कमी त्रास.

– बनावट मायक्रोचिप बनवता येत नसल्याने सुरक्षिततेची हमी.

– विशिष्ट क्रमांकामुळे श्वानाची संपूर्ण माहिती ऑनलाइन उपलब्ध.

– एकदा बसविल्यानंतर पुन्हा बसविण्याची गरज नाही.

– श्वानाची नसबंदी, लसीकरणाची अद्ययावत माहिती ऑनलाइन उपलब्ध.

श्वानांचा वाढता उपद्रव

भटक्या श्वानांची संख्या : २.५ लाख

श्वान चावण्याच्या रोजच्या सरासरी घटना : ८० ते ९०