कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी रविवारी (१ जानेवारी) होणारी गर्दी विचारात घेऊन पुणे पोलीस तसेच ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऐतिहासिक स्तंभ सोहळ्यासाठी येणाऱ्या पुण्यासह राज्यातील ७० कार्यकर्त्यांना कोरेगाव भीमा परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या चौघांना नोटीस बजाविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतूक बदल

या सोहळ्यासाठी राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील अनुनायी उपस्थित राहतात. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे ग्रामीण, पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामीण पोलिसांनी या भागात ठेवलेल्या बंदोबस्ताचा आढावा काेल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शनिवारी (३१ डिसेंबर) यांनी घेतला. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल या वेळी उपस्थित हाेते.

गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे तसेच राज्यातील ७० जणांना कलम १४४ नुसार कोरेगाव भीमा परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आदेशाचा भंग केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

हेही वाचा- विमानतळावरील सर्वेक्षणात पुण्यातील आणखी एका प्रवाशाला करोना संसर्ग

समाजमाध्यमावर नजर

ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी समाजमाध्यमावरील मजकुरांवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पुणे पोलीस, ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून समाजमाध्यमातून प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या चौघांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयानांनी पोलिसांना सहकार्य करुन कार्यक्रम शांततेत पार पाडावा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे.

हेही वाचा- बारामती: केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर; विरोधकांनी एकत्र येऊन विचार करावा, माजी मंत्री शरद पवार यांचे मत

सीसीटीव्ही, ड्राेन कॅमेऱ्यांची नजर

कोरेगाव- भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी पेरणे फाटा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तात राहणार आहेत. अभिवादन सोहळ्यात हाेणारी गर्दी विचारात घेऊन पेरणे फाटा परिसरात २४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सोहळ्यावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict police presence in koregaon bhima area pune print news rbk 25 dpj
First published on: 31-12-2022 at 18:18 IST