पुणे : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी (२ मार्च) जाहीर होणार आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाचे गोदाम, तसेच शहरातील मध्यभागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसबा पोटनिवडणुकीतील प्रचारात राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यातील चुरशीच्या लढतीकडे राज्यातील नागरिकांसह वरिष्ठ राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या, तसेच पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले. आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, निकाल जाहीर होण्यास २४ तास राहिले आहेत. गुरुवारी (२ मार्च) दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (१ मार्च) पोलीस आयुक्तालायात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.

हेही वाचा – पिंपरी महापालिका शाळेतील शिक्षकांचा ताण होणार कमी; मानधनावर १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरणार

निकाल जाहीर झाल्यानंतर संभाव्य अनुचित घटना आणि कार्यकर्त्यांमधील वाद टाळण्यासाठी पोलिसांकडून कोरेगाव पार्क येथील शासकीय अन्न धान्य महामंडळाचे गोदाम, तसेच मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियाननगर, कासेवाडी भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरेगाव पार्कमधील गोदामात मतमोजणी होणार असून, तेथील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत.

समाजमाध्यमावर पोलिसांचे लक्ष

समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकुरावर पोलिसांची नजर राहणार आहे. सायबर गुन्हे शाखेचे पथक समाजमाध्यमातील संदेशांवर लक्ष ठेवणार आहे. गैरप्रकार तसेच आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला नाही. निकालानंतर शहरात काही पडसाद उमटल्यास संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची नजर राहणार आहे. निकालापूर्वी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा – “महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव दिसतोय म्हणूनच…”; भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची टीका

दहावीच्या परीक्षांमुळे वाहतूक पोलिसांना सूचना

दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना त्वरीत पोहोचता यावे, तसेच कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात पाेलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict police security in kasba and police prohibited from taking out victory procession after the result pune print news rbk 25 ssb
First published on: 01-03-2023 at 17:48 IST