पुणे : ‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील अस्वच्छता, पाण्याचा तुटवडा आणि मूलभूत सुविधा नसल्याच्या तक्रारींवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (मनविसे) विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. वसतिगृहातील भोजनगृहातील जेवणात झुरळ, माशा आणि स्टेपलर पिन सापडल्याचा आरोप करून मनविसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी वसतिगृह प्रमुखांसमोर प्रतीकात्मक ‘झुरळांचे ताट’ सादर केले.

‘मनविसे’चे शहराध्यक्ष धनंजय दळवी, विभाग अध्यक्ष केतन डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी सचिन पवार, रुपेश घोलप, अभिषेक थिटे, विक्रांत भिलारे, आशुतोष माने, संतोष वरे, अशोक पवार, नीलेश जोरी, हेमंत बोळगे उपस्थित होते.

‘विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील मेसमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरण आहे. स्वयंपाकघरात झुरळे, दुर्गंधी आणि अन्न व्यवस्थापनात निष्काळजीपणा आढळतो. विद्यार्थिनींनी आरोग्याशी संबंधित तक्रारी अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही कार्यवाही झाली नाही. तसेच, वसतिगृहात पाण्याचा तुटवडा, अस्वच्छ बाथरूम, तुटलेले दार-खिडक्या, वारंवार बंद पडणारी लिफ्ट, वायफाय व मोबाइल नेटवर्कचा अभाव अशा समस्याही दीर्घ काळ प्रलंबित आहेत. २४ तास पाणी व वीजपुरवठा आणि संपूर्ण वायफाय सुविधा देण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात काही झालेले नाही,’ असे दळवी यांनी सांगितले.

वसतिगृहातील मेसची तत्काळ स्वच्छता व देखभाल करणे, चोवीस तास पाणी आणि वीज पुरवठा, कायमस्वरूपी वसतिगृह व्यवस्थापकाची नेमणूक करणे, विद्यार्थिनींसाठी २४ तास तक्रार निवारण यंत्रणा, निष्काळजी अधिकारी, मेस व्यवस्थापक व वॉर्डन यांच्यावर कारवाई करणे अशा मागण्या विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली. या बाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील तक्रारींची विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या संदर्भात प्राध्यापकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर सुविधा पुरवण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. – डॉ. डी. एन. सोनावणे, कुलसचिव, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ