लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या पुलावरून वाहतूक करणे सुलभ व्हावे, यासाठी निगडी-दापोडी मार्गावर हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने थेट पद्धतीने सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या वतीने डेअरी फार्म येथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. वाहनांना लांब अंतरापर्यंतचा वळसा मारून ये-जा करावी लागू नये यासाठी पूल जेथून सुरू होतो, त्या ठिकाणी निगडी-दापोडी मार्गावर भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. हा भुयारी मार्ग हलक्या वाहनांसाठी असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो मार्गाखालचा पहिलाच भुयारी मार्ग

मेट्रोच्या मार्गाखालून जाणारा हा शहरातील पहिलाच भुयारी मार्ग असेल. भुयारी मार्ग बांधण्यास महामेट्रोने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. भुयारी मार्गामुळे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक किंवा नाशिक फाटा चौकाकडून वळसा मारून ये-जा करण्याची आवश्यकता भासणार नाही.