सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा विद्यापीठात राजकीय राडा झाला. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाली. या हाणामारीच्या प्रकारावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवरून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. तसेच याप्रकरणी चौकशीची मागणीदेखील केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याबाबत कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली होती. या कृतीच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर निषेध आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान, भाजपा कार्यकर्ते आणि विद्यापीठात सदस्य नोंदणी करत असलेल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेची दखल घेत मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपाप्रणित विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर विद्यापीठात आंदोलन करायला सुरुवात केली. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करणं सत्ताधारी पक्षाला शोभत नाही. शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही.

हे ही वाचा >> पुणे महामेट्रो करणार सर्वंकष वाहतूक आराखडा, निगडी ते हिंजवडी मेट्रो धावणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार सुळे यांनी म्हटलं आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खेड्यापाड्यातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मारहाण करणारे गुंड विद्यापीठात कसे घुसले आणि त्यांनी कोणत्या अधिकाराने या मुलांना मारहाण केली? याची कसून चौकशी होण्याची गरज आहे. गृहमंत्र्यांचे (देवेंद्र फडणवीस) या गुंडगिरीला अभय आहे का? याचाही खुलासा यानिमित्ताने व्हायला हवा. विद्यापीठाच्या कुलगुरू महोदयांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी.