लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: आपल्याकडील मोठ्या बँकांचे विलीनीकरण करून आणखी मोठ्या बँका तयार करण्यात येत आहेत. जागतिक पातळीवरील स्थिती पाहता मोठ्याच बँका कोसळत असल्याने आर्थिक संकट निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे छोट्या बँकांनाच आता सक्षम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात प्रभू बोलत होते. या वेळी सुरेश प्रभू म्हणाले,की देशातील मोठ्या बँकांचे विलीनीकरण करून त्या आणखी मोठ्या करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे देशातील प्रमुख बँकांमध्ये आपल्या बँकांचीही नावे येतील, असा युक्तिवाद केला जातो. मोठी बँक सहजासहजी कोसळणार नाही, असेही सांगितले जाते. प्रत्यक्षात जागतिक पातळीवर मोठ्या बँका कोसळत असून, त्यांच्यामुळे आर्थिक संकट निर्माण होत आहे. या बँकांना सरकारकडून मदत दिली जात असून, ती पर्यायाने करदात्यांच्या पैशातून केली जात आहे. मोठ्या बँकांपेक्षा छोट्या बँकांना पाठबळ देण्याची गरज आहे. छोट्या बँकांना मदत करून ताकद दिल्यास त्या प्रगतीत मोठा हातभार लावतील.

आणखी वाचा- पुणे-मुंबई थेट विमानसेवा सोयीची की गैरसोयीची? विमानांच्या वेळांबाबत प्रश्नचिन्ह

पुरुषप्रधान संस्कृतीऐवजी महिलांनी समाज चालवल्यास सगळेच प्रश्न सुटतील, असे सांगून प्रभू म्हणाले, की महिला या सक्षमपणे घर चालवतात. इतर देशांच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे. भारतातील महिलांना किमान वेतन दिले तरी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २ ते ३ टक्क्याने वाढेल, असा अहवाल आहे. त्यामुळे महिलांच्या हाती सूत्रे दिल्यास देशाची प्रगती अतिशय वेगाने होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh prabhu reacts on global banking crisis pune print news stj 05 mrj
First published on: 23-03-2023 at 16:00 IST