पुणे : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यात सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे दहा हजार प्रगणकांमार्फत सर्वेक्षणाला सुरूवात झाली. मात्र, सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाइल ॲपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने पहिले दोन दिवस संथगतीने सर्वेक्षण सुरु होते. तसेच जिल्ह्यातील दोन तालुके आणि १०० गावे सर्वेक्षणाच्या मोबाइल ॲपमध्ये दिसतच नसल्याची बाब समोर आल्यानंतर तातडीने एनआयसीने दुरुस्ती केली.
शुक्रवार, शनिवार आणि रविवार (२६, २७ आणि २८ जानेवारी) या शासकीय सुट्यांच्या कालावधीत सर्वेक्षणाशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून तहसील, प्रांत आणि जिल्हाधिकारी ही कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील एक कोटीपेक्षा जास्त नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे दूर करून तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारपर्यंत (२५ जानेवारी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून चार लाख २३ हजार ८५४ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात प्रशासनाला यश मिळाले. त्यामध्ये पुण्यातील एक लाख ७४ हजार २५७, पिंपरी-चिंचवडमधील एक लाख दोन हजार २०२ आणि ग्रामीण भागातील एक लाख ४७ हजार ३९५ अशा एकूण चार लाख २३ हजार ८५४ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.