लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडील रहिवाशांचे सेवाकरांच्या देयकांचे वितरण आणि झोपडीवासीयांचे सर्वेक्षण महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ शहर उपजीविका केंद्राच्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत हे काम केले जाणार आहे.

समाजविकास विभागाकडील दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पवना शहरस्तरीय संघ स्थापन करण्यात आलेला आहे. या अंतर्गत महिला बचत गटांची जोडणी करण्यात आली आहे. त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हा सिद्धी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. झोपडीवासीयांच्या सर्वेक्षणाचे कामही महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे.

शहरात २००२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण ७१ झोपडपट्ट्या आहेत. त्यांपैकी ५५ झोपडीधारकांना सेवाकराची देयके देण्यात येतात. मात्र, सेवाशुल्क देयक भरण्याबाबत नागरिकांची उदासीनता दिसून येते. आता बचत गटांच्या महिला ऑनलाइन ॲपद्वारे झोपडीवासीयांचे सर्वेक्षण करणार आहेत. त्यांना सेवाशुल्कांची देयके वितरित करून नागरिकांची जनजागृती करणार आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २३ हजार ७७८ देयकांचे वितरण महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच ज्या झोपडीधारकांची नोंद नाही. परंतु, झोपडी अस्तित्वात आहे आणि त्यांना सेवाशुल्क देयक येत नसेल, अशा झोपडीधारकांची मोबाइल ॲपद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले, ‘सर्वेक्षण करणाऱ्या महिला झोपडपट्टी क्षेत्रातील रहिवासी आहेत. त्यांच्या मार्फत सेवाशुल्क देयकांचे वितरण करून सर्वेक्षणासाठी आवश्यक असणारी माहिती ऑनलाइन पद्धतीने संकलित करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि समाजविकास विभागाचे समूह संघटकही नियुक्त केले आहेत. फोटो पासधारक व ज्यांच्या नावे सेवाकराची देयके येतात, त्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या महिलांना सहकार्य करावे.’