पिंपरी महापालिकेच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा ‘स्वरसागर’ महोत्सव यंदा ७ ते १० जानेवारी दरम्यान होणार असून नव्या वर्षांच्या प्रारंभीच रसिक प्रेक्षकांना सांगितिक मेजवानी मिळणार आहे. त्यासाठी चिंचवड व संभाजीनगर ही दोन ठिकाणी निश्चित करण्यात आल्याने महोत्सवाची फरफट होण्याची परंपरा कायम राहणार आहे.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात ७ जानेवारीला महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते स्वरसागरचे उद्घाटन होणार असून उस्ताद गुलाम नियाज खान यांच्या गायनाने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर गणेश वंदना व स्वरसागर गीतावर आधारित नृत्य होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर सतार वादक उस्ताद शाहीद परवेज खान आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक पं. अतुल उपाध्ये यांचा वादन व जुगलबंदीचा कार्यक्रम होईल. ८ जानेवारीला दुपारी ४ ते ८ पर्यंत संगीत अकादमी आणि स्थानिक कलाकारांचा ‘रंगतरंग’ हा कार्यक्रम आहे. त्यानंतर पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन व त्यानंतर परिमल फडके यांचा शास्त्रीय नृत्यावर आधारित कार्यक्रम होणार आहे. त्यापुढील दोन दिवसांचे कार्यक्रम संभाजीनगरच्या साई उद्यानात आहेत. ९ जानेवारीला ‘अमर बन्सी’ हा अमर ओक व सहकाऱ्यांचा बासरी वादनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन होईल. अखेरच्या दिवशी संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम तसेच हिंदूी व मराठी गीतांची मैफल होणार असून सुरंजन खंडाळकर, प्रसन्नजित कोलंबी, आनंदी जोशी, गौतमी चिपळूणकर यांचा सहभाग राहणार आहे. महापौर मोहिनी लांडे आणि मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.