पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या न्यायालयीन कोठडीत ८ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी बुधवारी दिले.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली होती. बलात्कार प्रकरणात आरोपी गाडे याला अटक करण्यात आली होती. गाडेची डीएनए चाचणी पोलिसांनी केली असून, अद्याप पोलिसांना अहवाल मिळालेला नाही. डीएनए अहवाल मिळाल्यानंतर लवकरात लवकर गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडेच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी कारागृहातून त्याला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे (व्हिडिओ काॅन्फरसिंग) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी गाडेला कारागृहात भेटण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती त्याचे वकील ॲड. वाजेद खान-बिडकर यांनी केली. त्याला खटल्याबाबत काही सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित तरुणीच्या वतीने ॲड. श्रीया आवले उपस्थित होत्या. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी गाडेच्या पोलीस कोठडीत ८ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची विनंती पुणे पाेलिसांनी गृह विभागाकडे केली आहे.