पुणे : त्यांच्या आयुष्यात आजवर केवळ उपेक्षा आणि अंधारच भरलेला. गरिबी, दारिद्र्य यामुळे रोजचे जगणेच आव्हानाचे बनलेले असताना त्यात दिवाळीसारखे सण, उत्सव तर कोसो दूर. डोंगररानी राहणाऱ्या या अशा ४२ निरागस आदिवासी कळ्या पाच दिवस ‘मधुरांगण’च्या अंगणी आल्या. मायेच्या या आजोळी त्यांनी यंदाची दिवाळी अनुभवली आणि इथल्या दिव्यांनी त्यांचे उपेक्षित चेहरेही उजळले ! पुण्यातील ‘स्वरूपसेवा संस्थे’तर्फे दरवर्षी उपेक्षित, निराधार अशा मुलांसाठी त्यांच्या ‘मधुरांगण’ प्रकल्पामध्ये दिवाळी साजरी केली जाते. यंदाही या उपक्रमांतर्गतच महाराष्ट्र–गुजरात सीमेजवळील त्र्यंबक परिसरातील तोरंगण या आदिवासी भागातील ४२ मुलामुलींना ‘मधुरांगण’मध्ये मायेने बोलावले होते.

धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल १० तासांच्या प्रवासानंतर ही मुले मधुरांगण येथे पोहोचली. एरवी डोंगररानी-जंगलात राहणारी ही मुले धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत पाच दिवस संस्थेत मुक्कामी राहिली. या पाच दिवसांत या मुलांनी नेहमीची दिवाळी तर साजरी केलीच पण विविध कला, गुण, विषयांशीदेखील दोस्ती केली. पहिल्या दिवशी या मुलांनीच ‘मधुरांगण’च्या अंगणात किल्ला बनवला. त्यासाठी त्यांनी स्वत:च शाडू मातीचे मावळेही बनवले.

परंपरा आणि कलेशी नाते जोडतानाच या मुलांनी या किल्ल्यामागील आपला इतिहास आणि भूगोलही इथे शिकला. पुढे आकाशदिवे तयार केले. पणत्या रंगवल्या. दिवाळीची ही तयारी झाल्यावर प्रत्यक्ष दिवाळीत उटणे लावून अभ्यंगस्नान, नवीन कपडे, औक्षण, रोज नवनवा फराळ असे आनंदाचे क्षणही त्यांनी वेचले. या जोडीनेच मग जादूचे प्रयोग, छोटासा ट्रेक, आरोग्य, व्यायाम असे विविध विषयांवरील चर्चा-मनोगते यांनी त्यांचे हे दिवस भारून गेले. या काळात या मुलांनी मुळशी धरण, शिवसृष्टी, शनिवारवाडा, गिरिप्रेमी संस्था, मेट्रो प्रवास अशा विविध स्थळ-संस्थांनाही भेटी दिल्या. सोबतीला पुन्हा खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा याने त्यांची ही दिवाळी उत्सवी झाली.

आजवर केवळ उपेक्षेचे जीवन जगणाऱ्या या मुलांसाठी हा साराच प्रकाशसोहळा अंतर्बाह्य आनंद देणारा होता. या काळात त्यांनी नवे कपडे, खाऊ, फटाके हे तर अनुभवलेच, पण जोडीनेच संस्थेने वाटलेले प्रेम, वात्सल्य, स्नेहही गाठीला बांधला. या साऱ्या आनंदासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित पटेल, राजकुमार मानधनिया, उमेश झिरपे, राजेश सारडा, अजित ताटे, सुयश मोकाशी, अंजली कात्रे यांच्यासह अनेकांनी योगदान दिले. या साऱ्यांनी आपली दिवाळीही या मुलांसोबतच साजरी केली. पाचव्या दिवशी हा सारा आनंदाचा, प्रेमाचा ठेवा घेत ही मुले आपल्या गावी परतली.