प्राची आमले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुष्काळमुक्त भारत करण्यासाठी शहरातील युवकांनी एक आगळीवेगळी चळवळ  सुरू केली आहे. अल्पावधीतच समाजमाध्यमांवर लोकप्रिय झालेल्या या संस्थेविषयी…

अनेकदा नवीन काही माहिती हवी असेल तर ती शोधण्यासाठी आपण इंटरनेटचा आधार घेतो. इंटरनेटमुळे आपल्याला लाभलेल्या समाजमाध्यमांनी आपल्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल केले आहेत. आज इंटरनेटवर खरेदी आहे, सल्लामसलत आहे, सामाजिक जाणिवेतून सुरू झालेल काम आहे आणि आता तर महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त गावात पाणी पोहोचवण्यासाठी युवकांनी एक चळवळ समाजमाध्यमांवर सुरू केली आहे. अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली आहे.

राज्यातील भीषण दुष्काळाने व्याकूळ झालेल्या जनतेची पाण्याची गरज भागवण्यासाठी ‘तहान’नावाची संस्था काम करत आहे. २०१६ मध्ये राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी नोकरदार, उद्योजक, मंत्री, अनेक संस्था सढळ हाताने मदत करत होत्या. या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आपला देखील खारीचा वाटा असावा या भावनेने विद्यार्थ्यांनी तहान या गटाची स्थापना केली. त्याद्वारे बारामती शहरातील दुष्काळग्रस्त गावांना मदत करण्यासाठी निधी उभारण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. महाविद्यालये, सेवाभावी संस्था तसेच समाजमाध्यमांतून मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.  संस्थेचे सहसंस्थापक कल्याण दुबल म्हणाले, देश दुष्काळमुक्त करण्याच्या हेतूनेच ‘तहान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरविणे तसेच आवश्यकतेनुसार राज्यातील इतर गावांमध्येही पाणी पुरवण्याचे काम संस्थेतर्फे करण्यात येते. एवढेच नव्हे तर ‘झाडे जगवा, तहान भागवा’ या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणाची मोहीमही हाती घेण्यात आली आहे.  संस्थेतर्फे झाडे  दत्तक योजना, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातात. पथनाटय़ातून जनजागृती केली जाते. तसेच जल व्यवस्थापन, जल संवर्धन आणि  सेंद्रिय शेती करणाऱ्या नागरिकांच्या मुलाखती ‘परिचय’ या उपक्रमाद्वारे लोकांसमोर आणल्या जात आहे. संस्थेच्या उपक्रमात समाजमाध्यमांनी मोठी भूमिका बजावली असून त्याविषयी दुबल म्हणाले, संस्थेचे काम फक्त शहरापुरते मर्यादित न राहता समाजमाध्यमांमुळे देशभरातील स्वयंसेवक या मोहिमेत जोडले गेले आहेत. संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक मोहिमेचा वेगळा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे. ग्रुपमध्ये सहभागी असलेले स्वयंसेवक हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असल्याने पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. मग अशा वेळी समाजमाध्यमांमुळे कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहितीची देवाणघेवाण करणे सहज शक्य होते.

संस्थेचे ‘तहान’ या नावाचे फेसबुक पेज आहे. या फेसबुक पेजच्या माध्यमातून पाण्याविषयी जगभरात ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्याची माहिती पेज ‘लाइक’ केल्यानंतर मिळते. यामध्ये विविध वृत्तपत्रे आणि  वृत्तवाहिन्यांमध्ये पाण्याविषयी येणाऱ्या बातम्या दिल्या जातात. तसेच ‘तहान’ या नावाने इन्स्टाग्राम, ट्विटर आणि संकेतस्थळदेखील आहे. संस्थेच्या आगामी उपक्रमांविषयी दुबल म्हणाले, माथेरानजवळील एका गावात पिण्यायोग्य पाणी नाही. या गावातील अशुद्ध पाणी पिल्याने स्थानिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तसेच लहान मुले दगावल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. या गावातील नागरिकांना किमान शुद्ध पाणी पिता यावे यासाठी पिण्याच्या पाण्याचे फिल्टर देण्यात येणार आहेत. तसेच गावातील शाळेत एक फिल्टर बसविण्यात येणार आहे. संस्थेच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी ८९८३१५५८२९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tahaan for drought free india
First published on: 12-12-2018 at 00:45 IST