पुणे : ताम्हिणी घाटात रसायन वाहतूक करणारा टँकर रविवारी सकाळी उलटला. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या ताम्हिणी घाटात रसायन गळती होण्याची शक्यता होती. वन विभाग, पोलीस, तसेच अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे उलटलेला टँकर पूर्ववत करण्यात आला. तसेच रसायन गळती रोखण्यात आली.
ताम्हिणी घाटातून महाडकडून पुण्याकडे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हायड्रोक्लोरिक ॲसिड घेऊन टँकर निघाला होता. टँकरमध्ये २४ हजार लिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड होते. डोंगरवाडीजवळ दाट धुक्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि टँकर रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातानंतर ॲसिड बाहेर पडून विषारी धूर निर्माण झाला होता. तो झपाट्याने उतारावरील झाडाझुडपांतून जंगलात पसरू लागला होता. त्यामुळे जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण हाेण्याची शक्यता होती.
या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे संचालक प्रमुख तुहिन सातारकर, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, समीर इंगळे, सागर दहींबेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीम, वनविभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाच्या जवानांनी रसायनाची गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू केले. रसायन निष्क्रिय करण्यासाठी ८०० किलो हायड्रेटेड लाइम पावडर वापरून निसर्गात पसरलेला ॲसिडचा धूर निष्क्रीय करण्यात आला. या भागाचे निरीक्षण, तसेच पाहणी वन विभागाकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे.