निरभ्र आकाश स्थितीमुळे तापमानातील बदलाची पुणेकरांना अनुभूती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर आणि परिसरामध्ये तीन ते चार दिवसांपासून दुपारी उन्हाच्या तीव्र झळांमुळे उकाडा, तर रात्री आणि प्रामुख्याने पहाटे थंड हवेची अनुभूती येते आहे. दुपारी विदर्भातील तापमान आणि पहाटे महाबळेश्वरच्या सध्याच्या कमाल तापमानाच्या आसपास शहरात तापमानाची नोंद होत आहे. दिवसा आणि रात्रीही आकाश निरभ्र राहत असल्याने ही स्थिती जाणवत असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस राज्यातून निघून गेल्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाली होती. या चक्रीवादळांचा प्रभाव दूर होताच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन राज्याच्या विविध भागासह पुण्यातही पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावली होती. या पावसापूर्वी आणि त्यानंतर मागील आठवडय़ापर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहत असल्याने कमाल तापमान सरासरीच्या आसपास होते. मात्र, त्यानंतर कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती सुरू झाली. त्यामुळे तीन ते चार दिवसांपासून ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव नागरिकांना मिळू लागला आहे.

निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे सूर्याचा प्रकाश थेटपणे पोहोचत असल्याने कमाल तापमानामध्ये वाढ नोंदविली जात आहे. अगदी सकाळी दहापासूनच हवेत उकाडा जाणवतो आहे. दुपारनंतर उकाडय़ाची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे शहराचे कमाल तापमान मागील चार दिवसांपासून ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडय़ातही सध्या याच दरम्यान कमाल तापमान नोंदविले जात आहे. रात्री मात्र तापमान कमी होत जाऊन पहाटेपर्यंत काहीशी थंडी अनुभवता येते. मागील आठवडय़ात २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेले किमान तापमान सध्या १७ ते १८ अंशांपर्यंत खाली आले आहे. २४ ऑक्टोबरला शहरात चक्क १६.५ अंश किमान तापमान नोंदविले गेले. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्येही सध्या किमान तापमान १६ ते १७ अंशांपर्यंत नोंदविले जात आहे. त्यामुळे तीव्र उकाडा आणि थंडी अशी तापमानाची दोन्ही रूपे शहरवासीयांना अनुभवता येत आहेत. दुपारची उष्णता थोडी अधिक असल्याने काहिलीत वाढ झाली आहे.

गारव्याचे गुपित

दिवसा उन्हाच्या झळा आणि रात्री गारवा या स्थितीबाबत पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ रविकुमार यांनी सांगितले, की दिवसा आणि रात्रीही आकाश निरभ्र राहत असल्याने ही स्थिती निर्माण होत असते. रात्री आकाश ढगाळ राहिल्यास उत्सर्जित गरम हवा परिसरातच राहते. त्यामुळे रात्रीचे तापमानही काहीसे वाढलेले राहते. मात्र, रात्रीही आकाश निरभ्र असल्यास उत्सर्जन वातावरणाबाहेर पडते. त्यामुळे संबंधित परिसरात तापमान कमी होऊन गारवा जाणवतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature in maharashtra
First published on: 26-10-2018 at 01:21 IST