पुणे : राज्यात पाच ते १८ जानेवारीपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून, पुढील आठवडाभर राज्यभरात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा किमान तापमानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राज्यात पाच ते १८ जानेवारीपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्या पुढील १९ ते २५ जानेवारी या काळातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा आहे. २६ जानेवारी ते एक फेब्रुवारीपर्यंतच्या आठवड्यात दक्षिण भारत वगळता किमान तापमान सरासरी इतके राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, दक्षिण हरयानावर हवेच्या वरच्या स्तरात हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. हवेची द्रोणीय रेषा उत्तर कर्नाटकपासून उत्तर प्रदेशापर्यंत तयार झाली आहे. आग्नेयेकडून येणारी बाष्पयुक्त हवा मध्य भारतापर्यंत जात आहे. त्यामुळे थंड हवा आणि बाष्पयुक्त हवेचा संयोग मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे रविवारी, सात जानेवारीपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अमरावती महसूल विभागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा : मुंबईच्या किमान तापमानात चढ – उतार सुरुच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर भारताला दाट धुक्याचा फटका

उत्तर भारतात गुरुवारी पहाटे दाट धुके पडले होते. पहाटे साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान दृश्यमानता अत्यंत कमी झाली होती. बरेलीत २५ मीटर, लखनौत २५, प्रयागराजमध्ये ५०, वाराणसीत ५०, गोरखपूरमध्ये २००, सुलतानपूरमध्ये २००, चंडिगडमध्ये २५, दिल्लीतील सफदरगंजमध्ये ५००, पालम ७००, तर राजस्थानमधील बिकानेर येथे दृश्यमानता केवळ २५ मीटर होती. दिल्लीसह उत्तर प्रदेश, चंडिगड, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि त्रिपुरामध्ये दाट धुके पडले होते. जम्मूमध्ये विरळ धुके होते. दाट धुक्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.