कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी खासगी संस्थेने सुचविलेल्या तात्पुरत्या उपाययोजना अंतिम टप्प्यात आहेत. या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता केली जाणार आहे. नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल खासगी संस्थेकडून लवकरच प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.

अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमलात आणण्यात येणार आहेत. त्याकरिता एका स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे. या संस्थेने सुचविलेल्या तात्पुरत्या उपाययोजना तातडीने हाती घेण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित खासगी संस्था, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) दूरदृश्यप्रणालीद्वारे मंगळवारी सकाळी बैठक पार पडली. त्यामध्ये या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. लवकरच ही संस्था दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल प्रशासनाला सादर करणार आहे.

याबाबत बोलताना एनएचएआयचे उपव्यवस्थापक अंकित यादव म्हणाले, ‘पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मंगळवारच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला. प्रस्तावित उपाययोजना प्रगतिपथावर आहेत. या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता एनएचएआय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), वाहतूक पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासन आणि या उपाययोजना सुचविलेली खासगी कंपनी अशा संबंधित यंत्रणांचे अधिकारी कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.’

तात्पुरत्या उपाययोजना काय?

* कात्रज बोगदा ते नवले पूल या सात किलोमीटरच्या परिसरात जड वाहनांसाठी उजव्या बाजूची स्वतंत्र मार्गिका.

हे बदल लक्षात येण्यासाठी कात्रज बोगदा संपल्यानंतर एक तपासणी नाका उभारणार.

* या ठिकाणी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांतील मोठे फलक लावण्यात येणार.

* वेगाला अडथळा आणण्यासाठी या सात कि.मी.मध्ये जास्त उंचीचे रम्बल स्ट्रीप बसविण्यात येणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* बोगद्यापासून नवले पुलापर्यंत जड वाहने न्युट्रल करू नयेत, यासाठी उद्घोषणा करण्यात येणार. * पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पादचारी उन्नत मार्ग (स्कायवॉक) उभारणार.