scorecardresearch

पुणे : व्यवसायातील भागीदारीच्या आमिषाने दहा कोटींची फसवणूक

आरोपींनी गांधी यांचे वडील दिनेशकुमार इंदरचंद गांधी यांना व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते.

पुणे : व्यवसायातील भागीदारीच्या आमिषाने दहा कोटींची फसवणूक
( संग्रहित छायाचित्र )

व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने व्यावसायिकाची दहा कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी जे. पी. रवीकुमार, त्यांची पत्नी तसेच आर. सुवर्णा (तिघे रा. आंध्रप्रदेश) आणि शिवानंद हत्ती (रा. जत. सांगली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हर्षित दिनेशकुमार गांधी (वय ३२, रा. सोपानबाग,घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी गांधी यांचे वडील दिनेशकुमार इंदरचंद गांधी यांना व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. आरोपींनी कन्स्ट्रक्शन ऑफ कॉटन इंडस्ट्री अ‍ॅण्ड ग्रोथ ऑफ कॉटन इंडस्ट्री तसेच श्री श्री रामा इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक तसेच भागीदारीची आमिष दाखविले होते. आरोपींनी दिनेशकुमार गांधी यांच्याकडून दहा कोटी १७ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर दिनेशकुमार यांना आरोपींनी एक कोटी ५८ लाख रुपये दिले. २०१९ मध्ये दिनेशकुमार यांचे निधन झाले. त्यानंतर हर्षित यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. आरोपींनी हर्षित यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे देण्यास नकार दिला.
त्यानंतर घाबरलेल्या हर्षीत यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अपहार, फसवणूक तसेच धमकावल्या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.