दरवर्षी सप्टेंबरमध्ये होणारी शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी, इंटरमिजिएट) यंदा नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून झाल्यानंतर ही परीक्षा होत असल्याने यंदा कलागुणांपासून विद्यार्थी वंचित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी कलागुणांचा लाभ दिला जातो. तब्बल एक लाख विद्यार्थ्यांना कलागुण मिळतात. त्यासाठी सप्टेंबरमध्ये दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरतानाच विद्यार्थी कलागुणासाठी पात्र असल्याचा उल्लेख केला जातो. साधारणपणे सप्टेंबरमध्ये एलिमेंटरी, इंटरमिजिएट घेतली जाते. मात्र यंदा विधानसभा निवडणूक आणि दिवाळीच्या सुटीमुळे ही परीक्षा दोनवेळा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा २७ ते ३० नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे कला संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या परीक्षा होत असल्याने कलागुणांचा अर्जात उल्लेख करण्यासंदर्भात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना कलागुण मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, दहावीचे विद्यार्थी चित्रकलेच्या गुणांपासून वंचित राहू नयेत यासाठी कला संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी समन्वय साधावा. समन्वयाअभावी अनेक वेळा कलाशिक्षक आणि मुख्याध्यापकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, असे कलाध्यापक संघ, पुणेचे सचिव सुनील बोरोले यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची चित्रकला परीक्षा नोव्हेंबरमध्ये होत असली, तरी संबंधित विद्यार्थ्यांची तयारी जूनपासूनच करून घेतली जाते. शाळांकडे चित्रकला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती असते. त्यामुळे शाळांकडून मुदतीत आलेल्या सर्व प्रस्तावानुसार विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. कोणताही विद्यार्थी चित्रकलेच्या गुणांपासून वंचित राहणार नाही यासाठी राज्य मंडळ प्रयत्नशील राहील.

– डॉ. अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ