पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कर्जफेडीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली असून, व्याजासह पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम बँकेमार्फत परत करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष अनिरुद्ध देसाई, संचालक निर्मला जागडे, पूजा बुट्टे-पाटील, सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी होळकर उपस्थित होते.

दुर्गाडे म्हणाले, ‘पीककर्जाची वसुली करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. व्याजासह पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. तसेच, सहकारी संस्थांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारकडे व्याजापोटी थकबाकी असलेले ९३ कोटी २० लाख रुपये बँकेने संबंधित सहकारी संस्थांना दिले आहेत. सरकारकडून व्याजाची रक्कम मिळेपर्यंत शेतकरी आणि सहकारी संस्थांना बँकेने दिलासा दिला असल्याचे दुर्गाडे यांनी स्पष्ट केले.

बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी ३,१२,६३९ सभासदांना २९९१.८३ कोटी कर्जाचे वितरण केले आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी १०,०५१ सभासदांना ४०७.१४ कोटी रुपयांचे मध्यम मुदत कर्ज वितरित केले आहे. वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या महिला बचत गटांना व्याजात चार टक्के सूट देण्यात येते. मार्च २०२४ अखेर वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या १५५५ बचत गटांना ४० लाख रुपयांची सवलत बँकेने दिली असल्याचे दुर्गाडे यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेच्या व्यवसायामध्ये ३०७३.६६ कोटींची वाढ होऊन २६,८२६ कोटींची व्यावसायिक उलाढाल झाली आहे. बँकेला यंदा ४३९.६१ कोटी रुपयांचा तरतूदपूर्व नफा झाला असून, निव्वळ नफा ७५.७५ कोटी झाला आहे, अशी माहिती दुर्गाडे यांनी दिली.

४० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज

बँकेमार्फत शैक्षणिक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजात चार टक्के सवलत देण्यात येते. २०२३-२४ या आर्थिक वर्षाअखेर ७०४ विद्यार्थ्यांना एक कोटी २७ लाख रूपयांची व्याज सवलत देण्यात आली आहे. शैक्षणिक कर्जामध्ये देशांतर्गत शिक्षणासाठीची कर्जमर्यादा ३० लाखांवरून ४० लाखांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे दुर्गाडे यांनी सांगितले.