scorecardresearch

पुणे : नवोदित अभिनेत्रीचा भररस्त्यात गोंधळ ; महिला पोलिसाच्या बोटाला चावा

हॅाटेल चालकाशी वाद झाल्याने भरस्त्यात नवोदित अभिनेत्रीने गोंधळ घातल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली.

women-arrest
( संग्रहित छायचित्र )

हॅाटेल चालकाशी वाद झाल्याने भरस्त्यात नवोदित अभिनेत्रीने गोंधळ घातल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. तिला समजावून सांगणाऱ्या महिला पोलिसाच्या बोटाला चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच महिला पोलिसाच्या बोटाला चावा घेतल्या प्रकरणी नवोदित अभिनेत्रीला अटक करण्यात आली.

या प्रकरणी काकुली विश्वास (वय २८, सध्या रा. अंधेरी, मुंबई, मूळ रा. बंगळुरू) हिला अटक करण्यात आली. याबाबत महिला पोलीस शिपाई परवीन शेख यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काकुली नवोदित अभिनेत्री आहे. तिने काही वेबसिरीजमध्ये छोट्या भूमिका केली आहे. ती कामाच्या शोधात असून ती पुण्यात कामानिमित्त आली होती. तिने वडगाव शेरी परिसरातील एक हॅाटेलमधील खोली ऑनलाइन आरक्षित केली होती. खोलीतील सुविधा तिला आवडल्या नाहीत. त्यामुळे तिने पैसे परत मागितले.

या कारणावरुन तिने हॅाटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती हॅाटेल व्यवस्थापनाने पोलिसांना दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या दामिनी पथकातील महिला पोलीस तेथे गेल्या. त्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हॅाटेलसमोरील रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या काकुलीला महिला पोलिसांनी गाडीत बसण्यास सांगितले. त्या वेळी दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी परवीन शेख यांच्याशी वाद घालून झटापट केली. तिने शेख यांच्या बोटाचा चावा घेतला. सरकारी कामात आणणे तसेच दुखापत केल्या प्रकरणी तिला अटक करणात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मुळुक यांनी दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The actress making a fuss in the street the woman bites the police pune print news amy

ताज्या बातम्या