लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: राज्यात अभियांत्रिकी, विधी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र वास्तुकला पदवी (बी. आर्च.) अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यासाठी अद्याप प्रतीक्षाच करावी लागत असून, प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थी-पालकांकडून विचारण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था असलेल्या वास्तुकला परिषदेने नियमावलीत केलेल्या बदलांच्या अनुषंगाने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. या बदलांना मान्यता मिळाल्यावर प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) स्पष्ट केले.
राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) राबवण्यात येते, तर तंत्रशिक्षणाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे नियंत्रण तंत्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात येते. राज्यात व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश समाईक प्रवेश परीक्षेद्वारे (सीईटी) होतात. त्यानुसार सीईटी सेलकडून विविध प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या. विविध सीईटींच्या निकालानंतर अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विधी अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या. प्रवेशांच्या गुणवत्तायाद्याही जाहीर झाल्या. त्यामुळे वास्तुकला अभ्यासक्रमाचीही प्रवेशप्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, वास्तुकला अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया रखडली आहे.
हेही वाचा… क्रीडा भरतीपासून उमेदवार वंचित, ‘हे’ आहे कारण
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील केवळ वास्तुकला अभ्यासक्रमाचीच प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. अद्याप या अभ्यासक्रमाची नोंदणीही सुरू करण्यात आलेली नाही. या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया का लांबणीवर पडली आहे याबाबतचे स्पष्टीकरण सीईटी सेल किंवा डीटीईने दिलेले नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
वास्तुकला परिषदेने वास्तुकला अभ्यासक्रमांच्या नियमावलीत बदल केला आहे. त्या अनुषंगाने राज्य पातळीवरही काही बदल आवश्यक आहे. त्यामुळे त्या बदलांचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येईल. – डॉ. विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण संचालक