बहुभाषिक चेहरा, शैक्षणिक केंद्रे, सुलभ वाहतूक आणि नागरी सुविधांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलतो आहे.
पुणे शहरानजीकचे छोटे गाव, पुरातन मंदिरे, पारंपरिक शेतीउद्योग, बलुतेदार मंडळी, घराघरांत सुतारकाम, माळरान, शिवकालीन वाडय़ावस्त्या असा कोंढवा गावचा पूर्वापार लौकिक होता. महारोगींचे हॉस्पिटल आणि पुनर्वसन केंद्र, कत्तलखाना ही इंग्रजी अमदानीची देणगी. स्वातंत्र्योत्तर काळात उभी राहिलेली, सैनिकांची वसाहत, बँकिंग क्षेत्राला मार्गदर्शक ठरलेली एनआयबीएम, दगडूशेठ ट्रस्टचा वृद्धाश्रम, बालसंगोपन केंद्र आणि शैक्षणिक संस्था, मुस्लिम समाजाचे वाढते प्रमाण आणि त्यांच्या धार्मिक, शैक्षणिक संस्था, इस्कॉन या धार्मिक विचाराची संस्था, त्यांचे वार्षिक उपक्रम, सर्वभाषिक राज्यातील सधन मंडळींसाठी उभे राहिलेले अत्याधुनिक मॉल ही आणि अशी ओळख कोंढव्याची आहे.
कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक अशी ढोबळमानाने या गावाची विभागणी आहे. कोंढवा खुर्द भागातील मूळ गावठाणामध्ये देवस्थान नावे असलेल्या मारुती आळी, बहिरोबा आळी, पांडुरंग आळी, त्याचबरोबर बौद्ध वस्ती, हराळे वैष्णव आणि भराडी मंडळींची वस्ती इ. प्रामुख्याने राहतात. पुणे मनपामध्ये समाविष्ट (१९५२) होण्यापूर्व गावठाण आणि नजीकची वस्ती जेमतेम २०० उंबरा होती. गावातील प्रत्येक घरात किमान एकजण सुतारकाम करीत होता.
इतर प्रत्येक गावाप्रमाणे कोंढव्यामध्येही भैरवनाथ, महादेव आणि विठ्ठल-रखमाईचे प्राचीन मंदिर असून, त्यांचा नव्या स्वरुपात विकास झाला आहे. वर्षभर चालणारे धार्मिक सण आणि गावकी भावकीतीलच मंगल कार्ये होत असल्याने पै-पाहुण्यांचा राबता खूप होता. बैलगाडय़ा आणि सायकली हेच मुख्यत्वे वाहतुकीचे साधन १९६० च्या दशकापर्यंत होते. मनपामध्ये समाविष्ट होण्यापूर्वी या गावामध्ये दोन विहिरींचे पाणी संपूर्ण गावाची गरज भागवत होते. कालांतराने घराघरात नळ आले, तरीही या विहिरींचे पाणी उद्यान विकासासाठी वापरले जात आहे, हे महत्त्वाचे वाटते.
गावाचे उत्सव, परंपरा हा त्या त्या गावाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. गावकरी हे एकमेकांचे भावकीतील आणि पंचक्रोशीतीलच असल्याने उरुसानिमित्त आलेल्या पाहुण्यांनी गाव गजबजून जात असे. परंपरेप्रमाणे ढोलताशांचे खेळ, कुस्त्यांचे आखाडे, तमाशांचे फड इ.च्या आठवणी शिवाजी श्रीपती लोणकर यांनी सांगितल्या. पूर्वी तमाशाचे फड बेसन भाकरीच्या जेवणावरसुद्धा यायचे. आता त्यांची सुपारी ७०-८० हजारावर गेली आहे. घरटी पाच रुपये वर्गणी. आता पाचशेच्या पुढे गेली आहे. मनपामध्ये येऊनही पूर्वी गावात १९७२ पर्यंत दोन विहिरी आणि चार नळकोंडाळी एवढीच पाण्याची व्यवस्था होती.
रात्री अपरात्री पाणी आल्याचे समजले की नळावर गर्दी होत असे. गावकऱ्यांचा एकोपा हे या गावाचे वैशिष्टय़ समजले. गणपती आणि शिवजयंती साजरी करणारी मंडळे अनेक असली तरी त्यांची मिरवणूक एकच निघते असे समजले. शेती व्यवसाय आता मागे पडला तरी बैलपोळ्याला बँड लावून आजतागायत मिरवणुकीची प्रथा गावाने जपली आहे.
मूळचे गावकरी आणि गावाच्या विकासात हातभार लावणाऱ्या ज्येष्ठ दिवंगतांचा उल्लेख महत्त्वाचा असतो. नामदेव लोणकर, रामचंद्र बाबर, बाळासाहेब लोणकर, भिकोबा लोणकर, निवृत्ती कापरे, भैरोबा लोणकर, काशिनाथ बाबर, मार्तंड लोणकर, दशरथ गव्हाणे आदी नावे या संदर्भात समजली. कोंढव्यातील महत्त्वाचे आणि मानवतापूर्ण कार्य म्हणून डॉ. बांदोरवाला कुष्ठरोग रुग्णालय आणि डॉ. मीनू मेहता अपंगोद्धार केंद्राचा उल्लेख महत्त्वाचा आहे. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी डॉ. मीनू मेहता अपंगोद्धार केंद्र ही संस्था कार्यरत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट मार्फत या परिसरात उभारली गेलेली सेवाकार्ये, कोंढव्याचे भूषण आणि दिलासा आहेत. पिताश्री वृद्धाश्रम, बालसंगोपन केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि ज्युनियर कॉलेज या आस्थापनांना प्रत्यक्ष भेट दिली.
बाल संगोपन केंद्रामध्ये तीस मुले निवासी असून १९८५ पासून आजतागायत तेराशेहून अधिक मुलांचे शिक्षण आणि रोजगार पुनर्वसन करण्यात आले आहे. वृद्धाश्रमामध्ये सत्तर ज्येष्ठ महिला- पुरुष निवासी असून, दरमहा नाममात्र तीन हजार रुपयांत निवास, भोजन, औषधोपचार सुविधा उपलब्ध असल्याचे व्यवस्थापक बाबासाहेब गव्हाणे
यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये २००४ पासून प्रतिवर्षी १०० पेक्षा अधिक विद्यार्थी तांत्रिक शिक्षण घेत आहेत. कुष्ठरोग पुनर्वसन केंद्रासाठी दगडूशेठ ट्रस्टचे महत्त्वपूर्ण अर्थसाहाय्य आहे.
कृष्णभक्तीतून, परमार्थाचे, मानवतेचे धडे देणारे इस्कॉन केंद्र याच परिसरात आहे. कोंढव्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूशन ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम) ही संस्था रिझव्र्ह बँकेच्या पुढाकाराने १९६९ साली स्थापन झाली. नव्या कार्यकर्त्यांपैकी महादेव बाबर, कृष्णा लोहोकरे, नारायण लोणकर, मुरली लोणकर, मदन शिंदे, तानाजी लोणकर, भाऊसाहेब पारगे, पंढरी लोणकर, साईनाथ बाबर, संतोष गोरड, प्रकाश काटे इ. चा उल्लेख आवश्यक आहे. कोंढवा परिसराची माहिती संकलित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष भोसले, काका पांगारे, कर्नल टी. सी. जोगळेकर, दगडूशेठ ट्रस्टचे गव्हाणे, गुजर, कुष्ठरोग पुनर्वसन केंद्राचे पाटील, चौधरी, इस्कॉनचे सुशील भिसे, आयटीआयचे संतोष गारुडी आदींचे सहकार्य लाभले.