पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या या खडकी येथील दारुगोळा कारखान्यामधील होत्या. हे माहिती असूनही कारखान्यातून गोळ्या बाहेर कशा गेल्या, याबाबत तपास करण्यात आला नसल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन तपास अधिकारी एस. आर सिंग यांनी बचाव पक्षाच्या उलटतपासणीत गुरुवारी न्यायालयास दिली.

सिंग यांची विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणी घेतली. सलग चार दिवस सिंग यांची उलटतपासणी सुरू आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या या खडकी दारुगोळा कारखान्यामधील होत्या हे माहिती असूनही, कारखान्यामधून गोळ्या बाहेर कशा गेल्या याबाबत तपास केला का, असे ॲड. इचलकरंजीकर यांनी सिंग यांना विचारले. त्याचा तपास केला नसल्याचे सिंग यांनी न्यायालयात स्पष्ट केले. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते, हे खरे आहे का असे बचाव पक्षाने विचारले असता त्यांनी गोळ्या झाडल्या असे माझे म्हणणे नव्हते. ते केवळ संशयित होते, असे सिंग यांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यात सहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यातील दोनच साक्षीदारांना संशयित आरोपींची छायाचित्रे दाखविली. इतर साक्षीदारांना छायाचित्रे का दाखविली नाहीत, हे मला सांगता येणार नाही, अशी माहिती सिंग यांनी दिली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघेही येरवडा कारागृहात होते हे माहिती होते. सगळे साक्षीदारही पुण्यातीलच आहेत, याची देखील माहिती होती. पण, मी त्यांची कारागृहातील ओळख परेड केली नाही, असे सिंग यांनी सांगितले. खंडेलवाल आणि नागोरीला आम्ही क्लीन चीट दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.