पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुक्रमे गट आणि गणाच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्याचा अहवाल १३ तालुक्यांतील तहसीलदारांकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार या अहवालांची अहवालाची छाननी करण्यात येणार असून, सोमवारी (१४ जुलै) प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर नागरिकांना २१ जुलैपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येतील.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील जिल्हा परिषदांच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून आराखड्याचा अहवाल शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला.

जिल्हा परिषदेचे २०१७ साली ७५ गट होते. तर, पंचायत समितीचे १५० गण होते. यंदा ७३ गट आणि १४६ गण असणार आहेत. समाविष्ट गावांमुळे हवेली तालुक्यातील सात गट कमी झाले आहेत. नवीन गट रचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची वाढ झाली आहे.

प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राजपत्रात येत्या १४ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावेळी हरकती आणि सूचनेसाठी हा आराखडा नागरिकांना खुला केला जाणार आहे. त्यावर २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती देण्याची मुदत देण्यात आली आहे. त्या हरकतींवर येत्या २८ जुलैपर्यंत सुनावणी घेण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविला जाणार आहे. अंतिम प्रभाग रचना १८ ऑगस्टपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मतदान केंद्रांचा आढावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या मतदान केंद्रासह, मतदारसंख्येचा आढावा घेतला. त्यात जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रे किती, त्यात नव्याने किती केंद्राची भर पडणार आहे. त्यासाठी मतदान यंत्रे किती लागतील, सध्या उपलब्ध यंत्रे किती आहेत. तसेच, उपलब्ध मतदान यंत्रापैकी खराब झालेली यंत्रे किती, या सर्व गोष्टींचे विश्लेषण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाच्या समन्वय अधिकाऱ्यांना दिले आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ईव्हीएमवर घेण्यात आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून यंत्रे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.