सैराट या मराठी चित्रपटात आंतरजातीय प्रेम विवाह करणाऱ्या आर्ची आणि परशाला शेवटी आपला जीव गमवावा लागला होता. असं जरी या चित्रपटात दाखवलं गेलं असलं तरी प्रत्यक्षात समोर येईल ती परिस्थिती एकमेकांच्या सोबतीने व्यवस्थित हाताळली, तर आंतरजातीय प्रेमविवाह देखील यशस्वी होतात याचं उदाहरण पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळालं. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त लोकसत्ता ऑनलाइने अशाच एका जोडप्याची प्रेमकहाणी जाणुन घेतली. कैलास पवार आणि तेजश्री भोसले असं या दाम्पत्याच नाव आहे. मागील २६ वर्षांपासुन ते सुखाने संसार करत आहेत.

आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर सुरूवातीच्या काळात त्यांना देखील अनेक अडचणींना तोंड द्याव लागलं. अनेकदा समाजातून होणारी अवहेलना देखील त्यांनी सहन केली. इतकंच नाहीतर अपमान देखील पचवावा लागला, मात्र त्यांचं प्रेम आजही अबाधित आहे.

तेजश्री ह्या पोलीस कर्मचारी आहेत. तर कैलास हे नुकतेच एका नामांकीत कंपनीमधुन निवृत्त झाले आहेत. सुरुवातीस कैलास आणि तेजश्री यांची जास्त ओळख नव्हती. १९९१ मध्ये तेजश्री सातारा येथे पोलीस दलात भरती झाल्या होत्या, त्यांचं प्रशिक्षण सुरू असताना दोघांची ओळख झाली. त्यानंतर तेजश्री एका पोलीस ठाण्यात रुजू झाल्या. दरम्यान तेजश्री यांना लग्नासाठी एक स्थळ आलं आणि त्यांच लग्न जुळलं होतं. तेव्हा, कैलास यांनी ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असं तेजश्री यांना सांगितलं व लग्नाची मागणी घातली होती. यानंतर त्यांनी मोठ्या बहिणीला देखील याबाबत सांगितलं, मात्र, तेव्हा त्यांनी लग्नास तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र या सर्व विरोधाला न जुमानता कैलास आणि तेजश्री यांनी पळून जाऊन आळंदीमध्ये विवाह केला. यानंतर त्यांना अनेक कठीण प्रसंगाना देखील तोंड द्यावं लागलं. अखेर, तेजश्री यांच्या कुटुंबीयांनी कैलास यांना वर्षभरानंतर स्वीकारलं. सुरुवातीस त्यांनी दहा बाय दहाच्या खोलीमध्ये दिवस काढत संसाराला सुरुवात केली. मात्र, आज खूप छान दिवस आहेत, अस दोघेही सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी प्रेम विवाहाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. सर्वजण म्हणायचे हे समाजाच्या विरोधात केलं आहे. घरच्यांसह समाजातील लोकांनी खच्चीकरण केलं, अनेकजण टोमणेही मारायचे. मात्र त्याकडे लक्ष न देता आमचा संसार आम्ही सुरू ठेवला. पाहता पाहता आज २६ वर्षे झाली आहेत. आम्हाला २४ वर्षांचा मुलगा असून तो स्वःकर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभा आहे, असंही ते अभिमानाने सांगतात. यावरून प्रत्येक आंतरजातीय प्रेमविवाहचा अंत हा सैराट सारखाच होत नसतो, असं यावरून दिसतं.