पुणे : राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील २३ जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षायादी २३ जानेवारीला रात्री उशीरा भूमी अभिलेख विभागाने जाहीर केली. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया चालू आठवड्यापर्यंत पूर्ण होऊन संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. मात्र, उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड आणि प्रतीक्षा यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे तलाठी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुमारे दोन हजार उमेदवारांचे भवितव्य तूर्त अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांकडून हरकती, आक्षेप मागविणे, त्यांचे निराकरण आदी प्रक्रिया पूर्ण करून तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारी रोजी रात्री उशीरा राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. या २३ जिल्ह्यांमधील निवड यादीत सुमारे २५२६ उमेदवार आहेत. या उमेदवारांना पुढील आठवड्यापासून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा – शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, आता होणार काय?

हेही वाचा – सराफी पेढीवर प्राप्तीकर विभागाचा छापा पडणार असल्याची बतावणी; पाच किलो सोने, ५० किलो चांदी चोरून पेढीतील व्यवस्थापक पसार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा लागू) १७ सवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यातील आदिवासीबहुल ठाणे, पालघर, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, नगर या १३ जिल्ह्यांमधील सुमारे १९३८ उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. या जिल्ह्यांमधील निवड, प्रतीक्षा यादी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानंतरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या उमेदवारांचे भवितव्य अधांतरीच राहिले आहे.