पुणे: सैन्यदल आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इतिहासातील मोठा क्षण शुक्रवारी अनुभवायला मिळाला. एनडीएतील १४८व्या तुकडीचे ऐतिहासिक दीक्षांत संचलन शुक्रवारी झाले. महिला छात्रांची पहिली तुकडी एनडीएतून बाहेर पडली. पहिल्या तुकडीतील १७ छात्रांंनी दीक्षांत संचलनानंतर पुशअप्स मारून आनंद साजरा केला.
मिझोरामचे राज्यपाल जनरल (नि.) व्ही. के. सिंह यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी केली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सरताज बेदी या वेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने २०२१मध्ये दिलेल्या अंतरिम निकालानंतर महिलांसाठी एनडीएचे दरवाजे खुले करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रवेश प्रक्रिया राबवून १९ महिला छात्रांची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली.
त्यापैकी १७ छात्रांनी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर आता या छात्रा पुढील एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यदलात दाखल होणार आहेत.